91 हजार जनावरांचे लसीकरण जिल्हयात 126 गुरांना लम्पीची बाधा 51 गुरे उपचारातून बरे
- Get link
- X
- Other Apps
जिल्हयात 126 गुरांना लम्पीची बाधा 51 गुरे उपचारातून बरे
वाशिम, दि. 20(जिमाका) देशातील काही राज्यात गुरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. आपल्या राज्यात काही जिल्हयात पाळीवगुरांना लम्पीचा संसर्ग झाला असून जिल्हयातील सहाही तालुक्यात आतापर्यंत 126 गुरांना लम्पीची बाधा झाली आहे. लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपायोजना करण्यात येत आहे. जिल्हयात आतापर्यंत 91 हजार 207 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून 51 जनावरे औषधोपचारातून बरे झाले आहे. जिल्हयातील ग्रामपंचायती स्वनिधीतून गुरांचे लसीकरण करीत असून जिल्हयात आतापर्यत 64 हजार 828 तर पशुसंवर्धन विभागाने 26 हजार 379 गुरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी दिली.
लम्पीमुळे जिल्हयातील 24 गावातील 126 गुरे बाधित असल्याचे आढळून आल्याने या गावांच्या 5 किलोमीटर परिघातील 119 गावातील 28 हजार 207 गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आतापर्यत 5 गुरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला.जिल्हयात लम्पी त्वचारोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होवू नये यासाठी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी तातडीने याबाबत बैठक घेवून तहसिलदार,गटविकास अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिल्हयात लम्पी प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होवून आजपर्यत 91 हजारांपेक्षा जास्त गुरांचे लसीकरण करण्यात आले.
गुरांना लम्पीचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी जिल्हयासाठी 53 हजार 935 लस उपलब्ध झाली आहे. 39 हजार 813 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हयातील गुरे लम्पीने बाधित होवू नयेत यासाठी पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा आणि ग्रामपंचायत यंत्रणा काम करीत आहे. लम्पी झालेल्या जनावरांचे दूध हे पिण्यासाठी सुरक्षीत असून माणसाला त्यापासून कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे नागरीकांना दूधामुळे लम्पी हा रोग होणार नसल्याचे डॉ. वानखेडे यांनी सांगितले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment