महिला व मुलींसाठी असलेल्या योजनांची व्यापक जनजागृती होणे आवश्यक -षन्मुगराजन एस.



महिला व मुलींसाठी असलेल्या योजनांची

व्यापक जनजागृती होणे आवश्यक

                                                                   -षन्मुगराजन एस.

‘ बेटी बचाओ बेटी पढाओ ’ सभा

वाशिमदि. 21 (जिमाका) जिल्ह्यात ज्या तालुक्यामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण कमी आहे, त्या तालुक्यांकडे विशेष लक्ष देण्यात यावे. माझी कन्या भाग्यश्री योजनेसह मुली व महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक असून त्यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होईल.असे जिल्हाधिकारी  षन्मुगराजन एस. म्हणाले.

आज 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कृती समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. षन्मुगराजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी बोलत ते होते. सभेला समितीच्या सदस्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू. पी. एम., उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) संजय जोल्हे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी (माध्यम) रमेश तांगडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मिनाक्षी भस्मे, जिल्हा औषधी निर्माण असोशिएशनचे अध्यक्ष राजेश सिरसाठ, डॉ. अलका मकासरे व स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षन्मुगराजन म्हणाले, जिल्हयातील नागरीकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या शोधासाठी मोहिम राबवावी. बोगस डॉक्टर आढळल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. गावात किंवा शहरात दवाखाना सुरु करणाऱ्या डॉक्टरांना ना हरकत प्रमाणपत्र देतांना त्यांच्या वैद्यकीय पदविका, पदवी तसेच नोंदणीच्या कागदपत्रांची तपासणी संबंधीत ग्रामपंचायत व नगरपलिकेने करावी. जिल्हयातील सर्व 63 सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी. डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्श्नशिवाय मेडिकल स्टोअर्समधून एच. आणि एच-1 प्रकारची औषधे रुग्णांना देवू नये, याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष लक्ष द्यावे. असे त्यांनी सांगितले.

श्रीमती पंत म्हणाल्या, बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. जिल्हयात गर्भलिंग निदान चाचणी होणार नाही याकडे लक्ष द्यावे. मुली व महिलांकरीता असलेल्या कायद्याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मुलींच्या सत्काराचे आयोजन करावे, असे त्या म्हणाल्या.

डॉ. कोरे यांनी 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर दरम्यान माता सुरक्षित ते घर सुरक्षित ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्री. जोल्हे यांनी लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत खात्री देणे, मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबाबत खात्री देणे हे बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. या अभियानाचा जिल्हयात वेगाने प्रचार-प्रसार करण्यासोबतच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठीत केल्या आहे. सन 2021-22 या वर्षात मुलींच्या जन्माचे प्रमाण 1 हजार मुलामागे 916 असून जिल्हयात एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2022 दरम्यान मुलींच्या जन्माचे प्रमाण 927 आहे. 3574 वृक्षारोपण करुन 3936 मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आल्याची माहिती श्री. जोल्हे यांनी यावेळी दिली. या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची उपस्थिती होती. 

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे