पशूंवरील लम्पी चर्मरोगाच्या अनुषंगाने अधिसूचना जारी खबरदारी म्हणून जनावरांच्या खरेदी विक्रीवर व गुरांच्या बाजारास प्रतिबंध
पशूंवरील लम्पी चर्मरोगाच्या अनुषंगाने अधिसूचना जारी
खबरदारी म्हणून जनावरांच्या खरेदी विक्रीवर व गुरांच्या बाजारास प्रतिबंध
वाशिम,दि.१३(जिमाका) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाकद व खडकी (सदार) येथील पाळीव गुरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला असून वाकद येथील गुरांच्या रोगाच्या नमुन्याचा निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्याने व लम्पी चर्मरोग आजाराचे जनावरे आढळून येत असल्याने या रोगाचा प्रसार जिल्ह्यात सर्वत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील गुरांच्या बाजारामध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी विक्री होत असते व त्यामुळे या रोगाचा प्रसार जिल्ह्यात सर्वत्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध करण्यात येत आहे.याशिवाय पुढील सूचनेपर्यंत जिल्ह्यातील गुरांचे आठवडी बाजार व आयोजित करण्यात येणारे पशुप्रदर्शन व बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात येत आहे. सर्व नागरिकांना या आदेशावरून सुचित करण्यात येते की,जनावरांना या आजाराची लक्षणे आढळून आल्यास संबंधित जनावरांच्या मालकांनी,संबंधित नागरिकांनी तातडीने नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी - कर्मचारी यांना या आजाराबाबत लक्षात आणून द्यावे.कोणीही जाणून बुजून माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प., सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालये,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, पशुधन विकास अधिकारी (पंस) यांनी नियोजन करून लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व जनजागृती करावी.संबंधित यंत्रणांनी तातडीने सर्वेक्षण सुरू करावे. या रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यामध्ये व्यक्ती,संबंधित पशुपालक, पशूवैद्यक, शासकीय, निमशासकीय अधिकारी , स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिरंगाई केल्यास अथवा कार्यवाहीत अडथळा आणल्यास त्याचेविरुद्ध प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोगास प्रतिबंध अधिनियम 2009 मधील कलम 31,32,33 व 34 मधील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.असे अधिसूचनेत नमूद केले आहे.
Comments
Post a Comment