अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी षण्मुगराजन एस.


अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी

षण्मुगराजन एस.

वाशिम दि.29 (जिमाका) अंमली पदार्थाच्या सेवन व वापरावर आळा घालण्यासाठी आणि अंमली पदार्थ ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नार्को-ऑर्डिनेशन सेंटर समिती गठित करून काम करण्याचे निर्देश दिले आहे.जिल्ह्यातील कोणताही युवक हा अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जाऊ नये यासाठी त्याच्या दुष्परिणामाची माहिती शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून कार्यशाळेच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना द्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.
          आज २९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय नार्को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.सभेला अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक शैलेश मीणा,जिल्हा आरोग्य अधिकारी सुहान कोरे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषध) व्ही.डी. सुलोचने,वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,उपशिक्षणाधिकारी श्री. डाबेराव,अन्न सुरक्षा अधिकारी जी.आर.ताथोड,जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ.हरण, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा.आर.बी. महाजन,राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्रा.एच.पी. वंजारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            श्री.षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात काही शेतात चोरट्या पद्धतीने गांजाची किंवा खसखस पिकांची लागवड होत असल्यास कृषी विभागाने खात्री करावी.लागवड होत असल्याचे दिसून आल्यास कृषी व महसूल विभागाने लक्ष देऊन ताबडतोब संबंधितावर कारवाई करावी.तसेच जिल्ह्यात गुटख्याची विक्री होणार नाही याकडे संबाधित विभागाने लक्ष देऊन गुटखा पकडण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असलेल्या व उपचार घेतलेल्या व्यक्तींना अंमली पदार्थाचे व्यसन होते का याची माहिती घेऊन त्या व्यक्तीचा पूर्व इतिहास घ्यावा. असे ते म्हणाले. 
          प्रारंभी श्री.जाधव यांनी नार्को को- ऑर्डिनेशन सेंटर समितीबाबतची माहिती दिली.ही समिती जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन, व्यापार आणि विक्री यावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे