राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाफुले महिला महाविद्यालयात सेवायोजन कार्डचे वितरण

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

फुले महिला महाविद्यालयात सेवायोजन कार्डचे वितरण

       वाशिम, दि. 29 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशिम येथे 28 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील 40 विद्यार्थीनींना सेवायोजन कार्डचे वितरण करण्यात आले.

          सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, स्वयंरोजगार व्यावसायीक माहिती देणे, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करणे, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, रोजगार मेळावे आयोजित करणे तसेच जे उमेदवार आपला स्वयंरोजगार सुरु करु ईच्छीतात अशा मराठा समाजातील उमेदवारांकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत १२ टक्केच्या मर्यादेत व्याज परतावा योजना कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेबाबत सुध्दा या कार्यक्रमात माहिती देण्यात आली.

          येत्या १४ व १५ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयात आयोजीत रोजगार मेळाव्यास उपस्थित राहुन आपला रोजगार प्राप्त करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नाविन्यतेस चालना देण्याच्या हेतूने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा २०२२ मध्ये सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा 2022 करीता जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवून आपल्याकडे असलेली नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. योजनेंतर्गतच्या अधिकच्या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी www.msins.in तसेच  www.mahastartupyatra.in या संकेतस्थळाला भेट दयावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

          कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील हे विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना म्हणाले, नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे उद्योजक बना. जेणेकरुन जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होईल आणि समाजातील राहणीमान उंचावण्यास आपली मदत होईल. महाविद्यालयातील प्रा.डॉ.नागेश्वर कन्हाके, प्रा.डॉ. शुभांगी दामले तसेच इतर शिक्षिका या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

          जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयातील संजय उगले, हिंमत राऊत, सिध्देश्वर खेडेकर, अमोल मरेवाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम येथील विद्यार्थीनींना सेवायोजन कार्ड ऑनलाईन पध्दतीने मिळून देण्यात आले. या विभागाच्या योजनेबाबत अधिक माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास कार्यालयास प्रत्यक्ष भेट देण्यात यावी. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी यावेळी केले.

                                                                                                                                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश