जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा व सोयाबीन मोझॅक नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना

जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा व सोयाबीन मोझॅक
 
नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना 

वाशिम दि.७(जिमाका) जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक व सोयाबीन मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव काही भागात आढळून येत असल्याचे दिसून आले आहे.याबाबत कृषी विभागाकडून सूचना मिळताच प्रक्षेत्र भेटीकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांची चमू जिल्ह्यात आज ६ सप्टेंबर रोजी उपस्थित होती. या चमूमध्ये कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ प्रकाश घाटोळ,मृत व कृषी रसायनशास्त्रज्ञ डॉ.अशोक आगे, कीटकशास्त्रज्ञ डॉ.सुनील भलकारे, विभाग प्रमुख वनस्पती शरीररचना शास्त्रज्ञ डॉ. ताराचंद राठोड यांनी वाशिम तालुक्यातील टो या गावातील सुभाष काकडे,माधव काकडे, बबन लगड व केकतउमरा येथील ज्ञानबा तडस या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली.
           प्रक्षेत्र भेटीदरम्यान या शास्त्रज्ञांनी सोयाबीन पिवळ्या मोझॅकबाबत दिसून येणारी लक्षणे आढळून आली आहे. सुरुवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट पिवळे ठिपके/चट्टे दिसले.कालांतराने ठिपक्यांच्या /चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा ऱ्हास होतो व फक्त शिरा हिरव्या राहतात आणि इतर भाग पिवळा पडतो.पाहणीमध्ये या शेतकऱ्यांच्या शेतावर अत्यंत कमी प्रमाणात म्हणजेच नुकसान पातळीच्या खाली सोयाबीन मोझॅक व्हायरसचे प्रभावीत झाडे आढळून आले.
        त्याकरिता कृषी विद्यापीठाच्या चमूने सोयाबीन मोझॅक व्हायरसच्या नियंत्रणाकरिता उपाययोजना सुचविल्या आहे.प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पेरणीसाठी निरोगी बियाण्यांचा वापर करावा. बियाण्यास पेरणीपूर्वी बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. पीक पेरणीनंतर ३० दिवसात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. 
          शेतात सोयाबीन पिकावर या रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून खड्ड्यात पुरून किंवा जाळून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने ट्रायझोफॉस ४५ ईसी १६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी. तसेच १२ इंच बाय १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन मुसायक व सोयाबीन पिवळा मोझॅकग्रस्त झाडाचे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी निरीक्षण करून अशा प्रकारचे झाडे आढळून आल्यास तात्काळ उपटून जमिनीत गाळून टाकावेत. जेणेकरून या रोगाचा प्रसार होणार नाही. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात झपाट्याने होतो.त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे