अपुर्ण कामे सप्टेंबरअखेर पुर्ण करण्याचेजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
- Get link
- X
- Other Apps
अपुर्ण कामे सप्टेंबरअखेर पुर्ण करण्याचे
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कॅच द रेन मोहिमेचा आढावा
· 10 लक्ष कामे पुर्ण, 8 लक्ष 82 हजार वृक्ष लागवडीचा समावेश
वाशिम, दि. 19 (जिमाका) : वृक्ष लागवडीची कामे तसेच भूगर्भात पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठवणूकीसाठी जलशक्ती अभियानाच्या कॅच द रेन मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आलेली सर्व कामे यंत्रणांनी तांत्रिकदृष्टया योग्य असल्याची खात्री करुन अपुर्ण कामे सप्टेंबरअखेर पुर्ण करावीत. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
आज 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘ कॅच द रेन ’’ मोहिमेचा आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक श्री. मीणा, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता निलेश राठोड, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपूर्वा नानोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मिलमिले, सर्व गटविकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, सर्व नगर परिषद-नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, “ कॅच द रेन ” मोहिमेअंतर्गत जिल्हयात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची प्रशासकीय व तांत्रिक चमू लवकरच जिल्हयाला भेट देणार आहे. यंत्रणांनी केलेली सर्व कामे संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावी. सर्व कामे योग्यप्रकारे आणि व्यवस्थीत झाली आहेत याची संबंधित यंत्रणांनी भेट देऊन खात्री करावी. असे ते म्हणाले.
श्रीमती नानोटकर यांनी या मोहिमेअंतर्गत जिल्हयात 10 लक्ष 13 हजार 209 कामे झाली असून यामध्ये 8 लक्ष 82 हजार 250 वृक्ष लागवडीची कामे आणि 1 लक्ष 30 हजार 959 इतर कामांचा समावेश असल्याचे सांगितले. जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाची 2232 कामे पुर्ण झाली आहे. यामध्ये चेक डॅमची 108 कामे, तलावांची 105 कामे, सार्वजनिक इमारतीच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे संकलन व पुनर्भरणाची 490 कामे, खाजगी इमारतीच्या छतावर पडणाऱ्या पावसाचे संकलन व पुनर्भरणाची 489 कामे, जुने तलाव व बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची 672 कामे, शोषखड्डयांची 218 कामे, पुनर्भरण स्ट्रक्चर दुरुस्तीच्या 2537 कामांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेअंतर्गत त्यांच्या विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment