बहुआयामी गरीबी कमी करण्यासाठी यंत्रणांची भूमिका महत्त्वाची -पालक सचिव नंदकुमार

बहुआयामी गरीबी कमी करण्यासाठी यंत्रणांची भूमिका महत्त्वाची 
                पालक सचिव नंदकुमार 

वाशिम दि.०३(जिमाका) रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या मागणीनुसार अकुशल हाताला काम उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता निर्माण होणे गरजेचे आहे. विविध सरकारी योजनांसह रोजगार हमी योजनेतील कामांची प्रभावी अंमलबजावणी करून बहुआयामी गरिबी कमी करण्यासाठी यंत्रणांची भूमिका महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (मनरेगा) तथा पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी केले.
              २ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शिक्षण विभाग आणि एकात्मिक बाल विकास यंत्रणेसोबत बहुआयामी गरीबी निर्देशांकात सुधारणा करण्याबाबच्या आयोजित कार्यशाळेत श्री नंदकुमार बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे उपसचिव श्री. साळुंखे,श्री. झालटे व निवास उपजिल्हाधिकारी श्री.हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 श्री. नंदकुमार म्हणाले, गरीबीच्या आयामावर शाश्वत रीतीने मात करण्यासाठी सर्व विभागांनी आपआपल्या योजनांचे मनरेगाच्या योजनांसोबत सक्रियपणे अभिसरण करणे आवश्यक आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा अर्थात मनरेगाचा सुधारित दृष्टिकोन मांडला जात आहे.मनरेगाचा वापर करून राज्यातील गरिबी संपुष्टात आणण्याबाबत कृती योजना मांडली जाणार आहे. कुपोषण दूर करण्यासाठी संबंधित कुटुंबांचे उत्पन्न वाढले पाहिजे.आजही देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. राज्यातील कुपोषण संपले तर ३२ टक्के लोकांची गरीबी दूर होईल असे ते म्हणाले.
         आहारात विविधता उपलब्ध झाल्यास कुपोषण कमी होण्यास मदत होईल असे सांगून श्री. नंदकुमार म्हणाले, कोविडनंतर शिक्षण पद्धतीत बदल झाला आहे. मोबाईलवर शिक्षण सुरू झाले आहे. आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान हे बहुआयामी गरीबी दूर करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षण आणि गरिबी हे कुपोषणाला कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.
         यावेळी मनरेगाचे राज्य प्रशिक्षक निलेश घुगे यांनी सभागृहात उपस्थित विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी,तालुका कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी(शिक्षण), केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी मनरेगाचा सुधारित दृष्टिकोन यावर गरीबीचे आयाम, बघू आयामी गरिबीचे विश्लेषण, गरीबीच्या वंचिततेच्या आयामावर आघात,वंचिततेत विविध निकष व विविध कामांचे प्राधान्य ठरविणे,प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर सभागृहातील उपस्थितांचे मत जाणून घेऊन त्यावर चर्चा घडवून आणली.आभार श्री.डाभेराव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे