रोजगार निर्मिती आणि शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा - पालक सचिव श्री. नंदकुमार
- Get link
- X
- Other Apps
रोजगार निर्मिती आणि शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा
वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयाचे मागासलेपण दूर करतांना गरीब कुटूंबांना रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध झाल्यास त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामधून विकास कामे झालेली दिसतील. शाळांतील मुलांच्या शैक्षणिक सुधारणेवर लक्ष देतांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे बघावे. एकंदरीतच जिल्ह्यात रोहयोतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्तेवर यंत्रणांनी भर द्यावा. असे निर्देश मनरेगा व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी दिले.
आज 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात श्री. नंदकुमार यांनी कुपोषीत मुलांच्या तसेच शाळेत नियमित उपस्थित न राहणाऱ्या मुलांच्या पालकांना मनरेगातून काम देणे आणि पालांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वेक्षणाचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम., रोहयोच्या उपसचिव श्रीमती खोपडे, रोहयोचे कार्यकारी अभियंता श्री. शहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे व मनरेगा राज्य समन्वयक निलेश घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. नंदकुमार म्हणाले, रोहयोमधून पूर्वी मागेल त्याला काम देण्यात येत होते. आता गरीबी दूर करण्यासोबत विकास कामे करण्यासाठी रोहयोतून काम करावे लागणार आहे. ज्यांच्याकडे कुपोषीत बालके आहेत या बालकांचे कुपोषण दूर व्हावे यासाठी त्या बालकांच्या कुटूंबाला मनरेगातून विविध योजनांचा लाभ देवून त्या कुटूंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करावी. कुपोषित बालकांच्या ज्या पालकांकडे जॉबकार्ड नाही अशा कुटूंबांना दोन दिवसात जॉबकार्ड उपलब्ध करुन द्यावे. तसेच त्वरीत त्या कुटूंबांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. जे बालक सलग 5 दिवस आणि वर्षभरात 30 दिवस शाळेत गैरहजर असतील अशा आर्थिक कारणाने अनियमित असलेल्या बालकांच्या पालकांना रोहयोमधून रोजगार उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन बालकांची शाळेत नियमित उपस्थिती राहील. आकर्षक शाळा व अंगणवाड्या तयार झाल्यास मुलांची गुणवत्ता निश्चितपणे वाढेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हयातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 100 टक्के अनियमित मुलांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे असे सांगून श्री. नंदकुमार म्हणाले, ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास चांगले शिक्षण देता येईल. त्यांचे भविष्य उज्ज्वल घडेल. कुपोषणमुक्त अंगणवाडी करण्यासाठी लोकसहभागातून बालकल्याण विभागाने प्रयत्न करावे. वाशिमजवळील शेलूबाजार मार्गावरील पालावर राहणाऱ्या बालकांना नियमित शाळेत पाठविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने करुन ही मुले शाळाबाह्य न राहता शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे. जिल्हयातील काही शाळांची प्रगती चांगली आहे. इतरही शाळा प्रगत होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. शाळांच्या प्रगतीचे मुल्यांकन करण्यात यावे. असे श्री. नंदकुमार यावेळी म्हणाले.
सभेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
********- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment