रानभाज्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेवून आहारात सेवन करावे - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.....रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

रानभाज्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेवून आहारात सेवन करावे

                        - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन

                  

        वाशिम, दि. 14 (जिमाका) : जेव्हा आजार बळावतात तेव्हा निसर्गातील औषधांची आठवण होते. रानभाज्यांचे औषधी गुणधर्म लक्षात घेता, नागरीकांनी दैनदिन आहारात रानभाज्यांचे सेवन करावे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.

         आज 14 ऑगस्ट रोजी आत्मा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन श्रीमती बुवनेश्वरी यांनी केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार,जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकस अधिकारी, गणेश गिरी, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. चातरमल, प्रभारी कृषी उपसंचालक श्री. धनोडे व स्मार्टचे जिल्हा व्यवस्थापक श्री. वाळके यांची उपस्थिती होती.

       श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, आशा सेविका व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गरोदर महिलांना आहारात रानभाज्यांचे सेवन करण्यास प्रोत्साहित करावे. कृषी विभागाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतकरी उत्पादन कंपन्यांनी मिळून वेगवेगळ्या उत्पादनाला सुरुवात केली पाहिजे. उत्पादित वस्तूंचे आकर्षक पॅकींग व मार्केटिंग केले तरच उत्पा‍दित वस्तुंची चांगल्याप्रकारे विक्री होण्यास मदत होईल. आपण विक्रीमध्ये कमी पडतो. विक्री कौशल्ये आपण आत्मसात केली पाहिजे. शेतकरी उत्पादन कंपन्या व बचतगटांनी एकत्र येऊन उत्पादीत वस्तूंची ब्रँडीग व विक्री करावी. आपल्या जिल्ह्यातून समृध्दी महामार्ग जात असल्यामुळे आपल्या जिल्हयातील उत्पादीत वस्तुंना मुंबई-नागपूरला बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी चांगली शेती करुन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. शेतीत  कष्ट करुन मुलांना चांगले शिक्षण देवून त्यांचे भविष्य घडवावे. असे त्या म्हणाल्या

       जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे सांगून श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या की, सोयाबीनपासून विविध उत्पादने कसे तयार करता येतील याकडे लक्ष द्यावे. उत्पादीत होणाऱ्या वस्तूंची उत्तम गुणवत्ता असली पाहिजे. आज कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असतांना लोकांचा कल हा विषमुक्त उत्पादने खरेदी करण्यावर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विषमुक्त उत्पादने  तयार करण्यावर भर द्यावा. जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करायचा आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

       प्रास्ताविकातून बोलतांना श्रीमती महाबळे म्हणाल्या, सर्व तालुक्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. केवळ जंगलातच नाही तर शेताच्या बांधावर देखील रानभाज्या असतात. आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे त्याचे महत्व नसते. त्यामुळे आपण त्या काढून टाकतो. निसर्गात विपूल प्रमाणात रानभाज्या आहे. रानभाज्यांचे दैनदिन आहारात सेवन केल्यास आपण आजारापासून दूर राहू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.

      प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.

      रानभाजी महोत्सवामध्ये श्री. गणेश स्वयंसहायत्ता महिला समुह जांभुरुन/भित्ते यांच्या झुनका भाकर, पिठलं, ज्वारी भाकर, पौष्टीक तृण धान्याचे विविध पदार्थ, रानभाज्यापासून तयार केलेले विविध पदार्थ, बळीराजा शेतकरी सोयाबीन तूर उत्पादक गट बेळखेडा ता. मंगरुळपीर, मॉ. जिजाऊ स्वयंसहायत्ता महिला बचतगट साखरा ता. वाशिम, रघुनाथ स्वामी महिला स्वयंसहायत्ता बचत गट सोयता ता. वाशिम, हिरकणी महिला बचतगट पारवा ता. मंगरुळपीर यांच्या विविध रानफळ व भाज्या, पंचशिल स्वयंसहायत्ता महिला बचतगट कोकलगांव ता. वाशिम यांचा सेंद्रिय सांभार, जिजामाता स्वयंसहायता महिला समुह रतनवाडी ता. मानोरा, संत गाडगेबाबा  सेंद्रिय धान्य व त्यापासून निर्मित पदार्थ, सेंद्रिय खत तसेच फळझाडे रोपे, भाग्यश्री गायकवाड यांनी सेंद्रिय ज्वारी आणि उडिद भाकरी, सिता वाघमारे यांचा रानभाज्यांचा भाकरी टेचा, तृप्ती पापड उद्योग वाशिम, विमलदत्त राजगुरु पापड मसाले, खारोडी व कुरडीसह विविध पदार्थ आणि कळंबा (महाली) येथील स्वराली गृह उद्योगाचे विविध मसाले, चटण्या, हळद व रानभाज्यांचे विविध स्टॉल लावण्यात आले.

      महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रानभाज्याचे महत्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, प्रकाश कोल्हे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे,संजय राऊत, आत्मा कार्यालय, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ,कार्यालय आणि वाशिम तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

       रानभाजी महोत्सवात जवळपास 84 प्रकारच्या रानभाज्या व कंदमुळे विक्रीस उपलब्ध होती. कार्यक्रमाला जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, महिला बचतगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

        कार्यक्रमाचे संचालन एम. डी. सोळंके यांनी केले. उपस्थितांचे आभार मंडळ कृषी अधिकारी श्री. जटाळे यांनी मानले.

******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे