विद्यार्थ्यानी शेती विज्ञानाची कास धरुन कृषि उदयोजकता जोपासावी बुवनेश्वरी एस.

विद्यार्थ्यानी शेती विज्ञानाची कास धरुन कृषि उदयोजकता जोपासावी   
                         बुवनेश्वरी एस.
वाशिम दि.18(जिमाका) भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे.आजचे युग हे विज्ञानाचे आहे.आज केवळ शेती करूनच चालणार नाही तर शेतीकडे उद्योग म्हणून बघितले पाहिजे.विद्यार्थ्यांनी देखील शेती विज्ञान कास धरून कृषी उद्योजकता जोपासावी.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले.
             
आज 18 ऑगस्ट रोजी  कृषी विज्ञान केंद्र करडा येथे जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून  प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शालेय विदयार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची सुरुवात व कृषि संस्कृती दालन, नैसर्गिक व सेंद्रिय निविष्ठा निर्मिती केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या संस्थेचे विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त चैतन्य देशमुख होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शहा,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे व कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आर.एल.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         आज शिक्षण घेत असतांना शाळकरी विद्यार्थ्यामध्ये प्रत्यक्ष पाहणीतुन शेतीची आवड निर्माण व्हावी शेती व शेतीपुरक व्यवसायाचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे या उददेशाने नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून कृषि विज्ञान केंद्राला हा प्रकल्प मंजुर करण्यात आला आहे. या प्रकल्पात जिल्हयातील पाच हजार विदयार्थ्याना संपुर्ण वर्षभर प्रक्षेत्र भेटीतुन कृषी तंत्रज्ञानाची ओळख व कौशल्य निपुनता जोपासली जाणार आहे.  
        यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृषि संस्कृती दालनातील एकात्मीक शेती पदधतीचे घटक व अर्थशास्त्रीय मांडणी,गांडुळ खत,सेंद्रिय व जैविक निविष्ठा उत्पादने,पशुपालन इत्यादीबाबतची माहिती माॅडयुल प्रकल्प समन्वयक पी.व्ही.देशमुख यांच्याकडुन जाणुन घेतली. 
             प्रक्षेत्रावर शालेय विद्यार्थ्याकरीता विशेष कृषि चर्चासत्र घेण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या स्वागत गीताने झाली.प्रास्ताविकातून डॉ.आर.एल.काळे यांनी कृषि विज्ञान केंद्राची ओळख व उदिष्ट्ये याबाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हयातील शेतक-यांना आधुनिक शेती पदधती, नैसर्गिक शेती व उपजिविकेला चालना देणारी तंत्रज्ञान आत्मसात होत असल्याचे सांगुन लाभ घेण्याचे आवाहन केले.
          चर्चासत्रात विद्यार्थ्याशी संवादामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी शेती व्यवसायातील संधी व बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडुन शास्त्रोक्त शेतीकडे नविन पिढीचा कल दिसत असुन यामध्ये कृषि प्रक्रिया उदयोगाची जोड देणे गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच उत्पादन खर्च कमी करण्यावर भर दयावा असे सुचविले.शेतीकडे व्यवसायीक दृष्टीकोन समोर ठेवुन ब्रॅंडिग,माकेर्टिग, तसेच शेती ही समुह पदधतीने करावी.  विदयार्थ्यांनी आठवडयातुन एक दिवस शेतीत जावे व आई वडिलांना पिक कर्ज,जमिन आरोग्य पत्रिका वापर,सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी मदत करावी अशी आग्रही भुमिका मांडली.
       जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरीफ शहा यांनी शेती व्यवसायाच्या संधी व यशोगाथा सांगुन उपस्थीत विद्यार्थ्याना शेतीकडे वळण्याकरीता प्रेरीत केले.तांत्रिक प्रशिक्षणानंतर विदयार्थ्यांनी प्रक्षेत्रावरील आधुनिक व शिफारशीत कृषि व पुरक व्यवसायांच्या विविध युनिटला भेट देवुन तंत्रज्ञान जाणुन घेतले.
याप्रसंगी कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ.एस.के.देशमुख, किटकशास्त्रज्ञ आर.एस.डवरे, एन.बी.पाटिल,डॉ.डि.एन.इंगोले, टि.एस.देशमुख,शुभांगी वाटाणे, एस.आर.बावस्कर यांनीसुद्धा आपले विचार मांडले.
         कलाशिक्षक पंकज उकळकर व त्यांचे चमू यांनी या कृषि पर्यटन केंद्राची पूर्ण मांडणी साकारली व कृषि संस्कृतीची जोड दिली.कार्यक्रमस्थळी आयोजित कृषि प्रदर्शनात ड्रोनव्दारे फवारणी तंत्रज्ञान,विविध कृषि अवजारे,प्रकाशने व सेंद्रिय निविष्ठा इत्यादी उत्पादनांचे दालन मांडण्यात आले.तसेच सहभागी विद्यार्थ्याना कृषि विज्ञान केंद्राची ओळख व घाटा गावाची चित्रफित दाखविण्यात आली.
           कार्यक्रमास भारत इंग्लीश कॉलेज व ज्यु. कॉलेज चिंचाबाभर, भारत माध्यमिक शाळा व ज्यु.कॉलेज रिसोड येथील दोनशे मुले,मुली व शिक्षकांची उपस्थिती होती.संचालन संदिप देशमुख यांनी केले.आभार निवृती पाटिल यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे