नाविन्यपूर्ण उद्योजकतेस मिळणार चालना विद्यार्थ्यांनो ! महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात सहभागी व्हा. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
नाविन्यपूर्ण उद्योजकतेस मिळणार चालना
विद्यार्थ्यांनो ! महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमात सहभागी व्हा
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांचे आवाहन
वाशिम, दि. 18 (जिमाका) : शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत "महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज' उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. नवउद्योजकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी व आवश्यक पाठबळ पुरविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.
प्रथम टप्प्यात महाविद्यालये, औद्योगीक प्रशिक्षण संस्था व इतर शैक्षणिक संस्थांची नोंदणी 31 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे. संस्थेतील नाविन्यपुर्ण संकल्पना असणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये नवसंकल्पनांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करुन आपला सहभाग नोंदवावा. यामध्ये उमेदवार वैयक्तिक अथवा कमाल 3 जणांच्या समुहामध्ये सहभागी होऊ शकतात. संस्थास्तरावर दोन उत्तम संकल्पनांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात जिल्हयातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या उत्तम दोन संकल्पनातून सर्वोत्कृष्ट 100 संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट 10 विजेत्यामध्ये 30 टक्के महिला, 50 टक्के औद्योगीक प्रशिक्षण संस्थांचे विद्यार्थी व एक जिल्हा एक प्रॉडक्ट संबंधित नवसंकल्पनांना प्राधान्य असेल. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे बिज भांडवल देण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात जिल्हयातील 10 नवउद्योजकांव्दारे त्यांच्या नवसंकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येईल. त्यामधील सर्वोत्कृष्ट 10 नवउद्योजकांना 5 लक्ष रुपयांचे बिज भांडवल देण्यात येणार आहे. त्याच बरोबर 12 महिन्यांचा विशेष इन्क्यूब्युशन कार्यक्रम दिला जाणार आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अधिकृत संकेतस्थळ www.msins.in अथवा स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या https://schemes.msins.in या पोर्टलवर भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयातील प्रतिक बाराहाते (9096855798) व अतिष घुगे (9850983335) यांच्याशी संपर्क साधावा. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या माध्यमातून आयोजित नवउद्योजक स्पर्धेत राज्यातील महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत व संस्थांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल शेळके यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment