वाहन चालकांनी आरोग्याची काळजीव प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन वाहन चालवावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर



वाहन चालकांनी आरोग्याची काळजी
व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन वाहन चालवावे
            जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

वाहन चालकांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर 
     
  वाशिम, दि. 29 (जिमाका) :  अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाहन चालकांसाठी करण्यात आलेले नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम आहे. वाहन चालकाच्या हाती वाहनात बसलेल्या केवळ प्रवाशांचा जीवच असतो असे नाही तर प्रवाशांच्या कुटूंबातील अनेक सदस्य देखील त्यांच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे वाहन चालकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेवून व प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन वाहन चालवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
           
आज 29 ऑगस्ट रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, वाशिम येथे वाहन चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीराच्या उदघाटक म्हणून श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर,माँ गंगा हॉस्पीटलचे संचालक डॉ.हरीष बाहेती,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
          
श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या,अपघात टाळण्यासाठी नियमानुसार वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. या कारवाईमुळे वाहन चालक भविष्यात अपघात होणार नाही, यासाठी सजगतेने वाहन चालवितात. वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांचे आरोग्य ही महत्वाची बाब आहे. आरोग्य चांगले नसेल तर तो व्यवस्थित वाहन चालविणार नाही. वाहन चालकांनी मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवणे गरजेचे आहे. आज प्रत्येक जण व्यस्त आहे. कोणत्यातरी तणावात प्रत्येक जण असतो. त्यामुळे मानसिक तणावाचा परिणाम हा कामावर दिसून येतो. प्रत्येक वाहन चालकाने आरोग्याची काळजी घेवून वाहन चालवावे. यामधून आपला जिल्हा अपघातमुक्त करता येईल असे त्या यावेळी म्हणाल्या.
          
डॉ. खेळकर म्हणाले, पूर्वी साथीचे आजार होते. आज नवीन आजार होत आहे. मोठया प्रमाणात आज वाहतूकीची साधने उपलब्ध झाली आहे. वाहन चालविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची तर तपासणी केली पाहिजेच पण डोळयांची देखील तपासणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
          
डॉ. बाहेती म्हणाले, वाहन चालवितांना ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी. रस्ते चांगले होत आहे. वाहन चालकांची दृष्टी चांगली असली पाहिजे. त्यामुळे अपघात होणार नाही. वाहन चालक हा तंदुरुस्त असला पाहिजे. वाहन चालकावर विश्वास ठेवून प्रवाशी हे प्रवास करतात. त्यामुळे वाहन चालकांने प्रवाशांच्या विश्वासाला तडा जावू देवू नये. सर्वांच्या सहकार्यातून जिल्हयातील अपघाताचे प्रमाण शुन्यावर आणता येईल असे ते म्हणाले. 
          
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी नेत्र व आरोग्य तपासणीसाठी लावण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी नेत्रदानाचा फॉर्म भरुन दिला. मान्यवरांच्या हस्ते काही वाहन चालकांना प्रातिनिधीक स्वरुपात चष्म्यांचे वितरण करण्यात आले.
          कार्यक्रमाला वाहतूकदार संघटना, ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक, वाहन चालक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले. संचालन श्याम बडे यांनी तर उपस्थितांचे आभार मोटार वाहन निरीक्षक संजय पल्लेवाड यांनी मानले.  
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे