मतदान हा हक्क असल्याने मतदार म्हणून नांव नोदणी करा .. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस




मतदान हा हक्क असल्याने मतदार म्हणून नांव नोदणी करा

                         जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


 बोरगाव येथे भटक्या जमातीची मतदार नोंदणी


महसूल सप्ताहाअंतर्गत प्रमाणपत्र व साहित्य वितरण

 

        वाशिम, दि. 1 (जिमाका) : जगातील आदर्श लोकशाही म्हणून  भारताकडे बघितले जाते. लोकशाही व्यवस्थेत मतदाराचे स्थान महत्वाचे आहे. 18 वर्ष पुर्ण झालेल्या व्यक्तीचा मतदार यादीत समावेश झाला पाहिजे. मतदान हा हक्क असल्याने समाजातील सर्व घटकातील पात्र व्यक्तींनी मतदार म्हणून नांव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले.

           आज 3 ऑगस्ट रोजी मालेगांव तालुक्यातील बोरगांव येथे नाथजोगी समाजातील भटक्या जमातीच्या मतदाराची नांव नोंदणी व महसूल सप्ताहानिमित्त आयोजित ‘एक हात मदतीचा’ या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजश्री कोरे, तहसिलदार दीपक पुंडे, सरपंच गीता लांडकर, उपसरपंच प्रशांत गुडधे, पोलीस पाटील वैशाली गुडधे, नाथजोगी समाजाचे प्रतिनिधी राजू अवताडे व संतोष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती

           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, निवडणूक आयोगाने भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांची नांव मतदारयादीत नोंदणी करण्यासाठी ज्या गावात हा समाज आहे, तेथे मतदार नांव नोंदणी शिबीराचे आयोजन करुन सर्व भटक्या विमुक्त जमातीमधील मतदारांची 100 टक्के नांव नोंदणी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे मतदार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र घेवून नांव नोंदणी करण्यात येईल. या जमातीच्या नागरीकांना पुढे जात प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच जात वैधता प्रमाणपत्र देखील उपलब्ध करुन दिले जातील. त्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करावे. असे त्या यावेळी म्हणाल्या.

          श्री. अवताडे म्हणाले, राज्यात भटक्या विमुक्त जमातीच्या नागरीकांकडे आधारकार्ड, रेशनकार्ड व मतदान कार्ड नाही. त्यांना जागेवरच हे कार्डस उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आजही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा समाज भटकंती करत आहे. शासनाने त्यांच्या कल्याणासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

           प्रास्ताविकातून माहिती देतांना तहसिलदार श्री. पुंडे म्हणाले, गावात गृहभेटी देवून मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. बोरगांवमध्ये 1292 मतदार असून नाथजोगी समाजाच्या 41 मतदारांची नव्याने नाव नोंदणी करण्यात येईल. 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी.भटक्या विमुक्त जमातीच्या व्यक्तींना स्वयंघोषणापत्र देवून मतदार नोंदणी करावी. गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडून फॉर्म भरुन घ्यावे. असे त्यांनी सांगितले.  

          यावेळी आयोजित शिबीरात नाथजोगी समाजातील 9 पुरुष व 11 महिला अशा एकूण 21 नवीन मतदारांची नांव नोंदणी करण्यात आली.3 पुरुष व 4 महिलांनी आधार नोंदणी केली तर सेतू सुविधा केंद्रातून विविध दाखले व प्रमाणपत्र गावातील लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले.

            मान्यवरांच्या हस्ते भागवत शिंदे व सुनिता शिंदे यांना नविन रेशनकार्ड, सुरेश गुडधे, व ऋतुजा गुडधे यांना वय अधिवास प्रमाणपत्र, सदानंद गुडधे ,भागवत गुडधे, महादेव लांडकर, गणेश तागड, जनार्धन गवई, वत्सला गुडधे, हनुमान लांडकर, व निवृत्ती गुडधे यांना उत्पन्न दाखले, ऋतुजा गुडधे हीला जातीचा दाखला, द्वारकाबाई शितोळे यांना श्रावणबाळ योजनेचा लाभ, प्रतिमा लांडकर व अनुसया शितोळे यांना कृषी विभागाच्या मिनी किटचे वाटप, अनिल शिंदे यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बाळू लांडकर, सखाराम लांडकर, विक्रम लांडकर कैलाश गुडधे यांना पिक विमा काढल्याने प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.  नैसर्गिक आपत्तीत शेळ्या दगावलेल्या मालकाला यावेळी नुकसान भरपाईचा धनादेश देण्यात आला.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक परसराम सावंत,ग्रामसेवक मोहन वानखडे, तलाठी विजय येल्लारे, कृषी सहायक प्रेमानंद कलुडोणकर, मालेगांव तहसिल कार्यालयातील कर्मचारी व निवडणूक विभागाचे अजय बांडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बोरगांव ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे