महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज, अनुदान, प्रशिक्षणव उच्च शैक्षणिक कर्ज योजनांचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आवाहन




महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज, अनुदान, प्रशिक्षण

व उच्च शैक्षणिक कर्ज योजनांचा लाभ घ्यावा

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांचे आवाहन

       वाशिम, दि. 28 (जिमाका) :  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध व अस्वच्छ सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींकरीता कर्ज/अनुदान/प्रशिक्षण व उच्च शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येतात. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती/नवबौद्ध आणि अस्वच्छ सफाई कामगार यांच्यावर अवलंबून असलेल्या पात्र व्यक्तींकरीता पुढील नमुद केलेल्या योजना कार्यान्वीत आहे.
         विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना - या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींसाठी विविध कुटीर उद्योगाकरीता ५० हजार रुपयापर्यंत बँकामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये महामंडळामार्फत १० हजार अनुदान दिल्या जाते व उर्वरित रक्कम बँक कर्ज स्वरुपात असते. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याकरीता महामंडळास ९५ कर्ज प्रकरणांचे भौतिक उद्दीष्ट देण्यात आले आहे.
          बिजभांडवल योजना - या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्तींसाठी विविध लघु उद्योगाकरीता ५० हजार ते ५ लक्ष रुपयापर्यंत बँकामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये महामंडळामार्फत एकुण मंजूर प्रकल्पाच्या २० टक्के बिजभांडवल रक्कम वार्षिक ४ टक्के व्याजदराने १० हजार रुपये अनुदानासह उपलब्ध करून दिल्या जाते. अर्जदार सहभाग ५ टक्के असून उर्वरित रक्कम बँक कर्ज स्वरुपात असते. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याकरिता महामंडळास ९५ कर्ज प्रकरणांचे भौतिक उद्दीष्ट दिले आहे.
          प्रशिक्षण योजना - या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र व्यक्ती ज्यांचे आर्थिक स्थितीमुळे शैक्षणिक खंड पडला असे व जे उमेदवार कौशल्य प्रशिक्षण अवगत करू इच्छितात अशा व्यक्तींना महामंडळामार्फत लघु कालावधीचे विविध व्यावसायीक प्रशिक्षण नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येते. या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण
कालावधी दरम्यान ३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याकरिता ३८० उद्दीष्ट देण्यात आले आहे.
          एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजना - राष्ट्रीय अनुसूचित जाती व वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायीक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरीता देशात तसेच विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमध्ये देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्याकरीता 20 लक्ष रुपयापर्यंत आणि देशाबाहेरील शिक्षणासाठी 30 लक्ष रुपये कर्ज मंजूर करण्यात येते. या कर्जावर ४ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येत असून, विद्यार्थीनीसाठी ३.५ टक्के व्याजदर आकारल्या जाते.

          एनएसकेएफडीसी उच्च शैक्षणिक कर्ज योजना - राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत सफाई कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायीक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरीता देशात तसेच विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेमध्ये देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्याकरीता 10 लक्ष रुपयापर्यंत आणि देशाबाहेरील शिक्षण घेण्याकरीता 20 लक्ष रुपये कर्ज मंजूर करण्यात येते. या कर्जावर ४ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात येत असून, विद्यार्थीनीकरिता ३.५ टक्के व्याज आकारल्या जाते.
          एनएसकेएफडीसी मुदती कर्ज योजना - राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत सफाई कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील पात्र व्यक्तींना विविध व्यवसायाकरीता 1 लक्ष रुपये ते 15 लक्ष रुपये एवढ्या प्रकल्प मर्यादेत महामंडळामार्फत कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. या कर्जावर वार्षिक ६ टक्के ते ८ टक्कयापर्यंत व्याज आकारणी करण्यात येते. सन 2023-24 या वर्षात जिल्ह्यासाठी ८३ कर्ज प्रकरणांचे उद्दीष्ट प्राप्त आहे.
          एनएसकेएफडीसी एसआरएमएस योजना - राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत सन 2017-18 या आर्थिक वर्षात झालेल्या सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यात स्वयंघोषित अस्वच्छ सफाई कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील पात्र व्यक्तींना विविध व्यवसायाकरीता एकुण ३० लक्ष रुपये वितरणाचे उद्दिष्ट प्राप्त आहे. या कर्जावर वार्षिक ६ टक्के ते ८ टक्कयापर्यंत व्याज आकारणी करण्यात येते. एनएसकेएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत एसआरएमएस योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते. तरी इच्छुक व पात्र व्यक्तींनी महामंडळाच्या अधिकृत https://nbrmahapreit.in तसेच https://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून कर्ज मागणी अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर वाशिम येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे