पूर बाधित व संपर्क तुटणाऱ्या गावातआवश्यक उपाययोजनांच्या दृष्टीने कार्यवाही करा - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा




पूर बाधित व संपर्क तुटणाऱ्या गावात

आवश्यक उपाययोजनांच्या दृष्टीने कार्यवाही करा

                                                                                     - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची सभा

         वाशिम, दि. 17 (जिमाका)  पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीने नदी नाल्यांना पुर येतो. पुराचे पाणी गावात जाऊन घरांचे व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होते. तसेच या गावांचा पुराच्या काळात इतर गावांशी संपर्क तुटतो. यापुढे पुराने गावे बाधित होणार नाही तसेच त्या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटणार नाही. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक त्या उपययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे काम आतापासूनच करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.

         आज 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

           श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की, ज्या गावांना पुराचा धोका निर्माण होतो व जी गावे नदी काठावर वसलेली आहे, तेथे पूर संरक्षक भिंत बांधणे व इतर कामे करण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावे. या पावसाळयात जे सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले त्या प्रकल्पातील गाळ यावर्षी प्राधान्याने काढण्यात यावा. प्रकल्पाच्या भिंतीवर वाढलेली झाडे तोडण्यात यावी. गावातील नालेसफाई वेळोवेळी करण्यात यावी. ज्यामुळे नाल्या तुंबणार नाही व पुराचे पाणी गावात येणार नाही. संबंधित यंत्रणांनी करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रके दोन आठवडयाच्या आत मान्यतेसाठी सादर करावे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या मार्गावरील कोणत्या पुलावर पुराचा अडथळा निर्माण होतो व त्यामुळे वाहतूक थांबते अशी ठिकाणे निश्चित करुन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापासूनच संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी. पुरामुळे कोणकोणत्या पुलावरुन पाणी वाहते अशा किती पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे हे शोधावे. असे त्या म्हणाल्या.

          आगामी निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता ही सर्व कामे वेळेच्या आत होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी आतापासूनच कार्यवाही करावी. असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की, जिल्हयातील एकाही गावाचे पुरामुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जे रस्ते पुराने नादूरुस्त झाली आहे ती तातडीने दूरुस्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तालुका यंत्रणांनी एकत्र बसून यावर आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. ज्या घरांची व गोठयांची अतिवृष्टीमुळे पडझड झाली आहे, त्यांचे पंचनामे प्राप्त करुन घेवून संबंधित नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीने त्वरीत कार्यवाही करावी. पूर संरक्षण उपाययोजनांचा अहवाल तालुकास्तरीय समितीने सादर करावा. आरोग्य विभागाने पावसाळयाच्या दिवसात साथरोग उदभवू नये यासाठी योग्यवेळीच उपाययोजना कराव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे मुबलक प्रमाणात औषधांचा साठा असावा. आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर दयावा. फायर ऑडीट प्रत्येक कार्यालयाने करावे. स्ट्रक्चरल ऑडीट करुन इमारती व पुलाची नव्याने बांधणी करण्याची आवश्यकता आहे का याची खातरजमा करावी. पुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती तातडीने उपलब्ध करुन दयावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.

           निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याची माहिती दिली. यावेळी उपस्थित तहसिलदारांनी पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची, कोणकोणत्या पुलावरुन अतिवृष्टीमुळे पाणी वाहून रस्ते बंद पडतात याबाबतची माहिती दिली.

            सभेत अतिवृष्टीमुळे जमीनीचे झालेले नुकसान, बाधित गावाचे स्थलांतरण करुन कायमस्वरुपी पुनर्वसन, ज्या गावांना महापुराने वेढा पडतो अशा गावांच्या पुनर्वसनांची आवश्यकता, जुलै 2023 मध्ये आलेल्या पूरामुळे रस्ते, पूल, रपटे, इमारतीच्या झालेल्या नुकसानीबाबत करावयाच्या उपाययोजना, पूरामुळे नुकसान झालेल्या व धोका असलेल्या गावांमध्ये पूर संरक्षक भिंत बांधकामाबाबत तसेच जुलै महिन्यातच आलेल्या अतिवृष्टीमुळे मनुष्य आणि पशुहानी व पिक नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

           या सभेला जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके, शिक्षणाधिकारी प्राथमिक राजेश शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्याम गोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यादगिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण संजय जोल्हे, महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमती नाजीया, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव,  तहसिलदार सर्वश्री गजेंद्र मालठाणे (वाशिम), कुणाल झाल्टे (कारंजा), राजेश वजिरे (मानोरा), रवि राठोड (मंगरुळपीर), दिपक पुंडे (मालेगांव), वाशिम नगर पालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड व मालेगांवचे मुख्याधिकारी श्री. सोनवणे यांची उपस्थिती होती. 

                                                                                                                                   *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे