योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मागासलेपण दूर करुन सर्वांगीण विकासाला चालना मिळणार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील.. भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा. शहिद जवानांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदारांचा सन्मान




योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून

मागासलेपण दूर करुन सर्वांगीण विकासाला चालना मिळणार

                                                            सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा

शहिद जवानांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदारांचा सन्मान

          वाशिम, दि. 15 (जिमाका) :  जिल्हयातील नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासोबत मागासलेपण दूर करण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून काम करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

          आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना ते बोलत होते. यावेळी पद्मश्री पुरस्कारप्राप्त साहित्यीक नामदेव कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, अपर पोलीस अधिक्षक भारत तांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी मोहन जोशी व नितीन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्री. वळसे पाटील म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार काम करीत आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडून येतील असे लोककल्याणकारी निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सरकारने सुरु केली आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजना नागरीकांपर्यंत शासन घेवून जात आहे. नागरीकांना या योजनांचा सन्मानपूर्वक लाभ मिळत आहे. नैसर्गीक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान राबविण्यात येत आहे. मेरी माटी मेरा देश अभियानाच्या माध्यमातून देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना या अभियानातून श्रध्दांजली वाहण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले.

           जिल्हयाच्या निर्मितीला मागील महिन्यात 25 वर्ष पुर्ण झाल्याचे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, जिल्हयाने या काळात विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. जिल्हयासाठी नुकतेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले. देशातील कोटयवधी बंजारा समाज बांधवांचे मुख्य तिर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी व उमरीचा विकास तिर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत करण्यात येत आहे. त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या अवकृपेने जिल्हयात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे अश्रृ पुसून त्यांना उभारी देण्यासाठी कोटयवधी रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्हयातील 92 हजार 346 शेतकऱ्यांना 584 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ दिला आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील सर्वसामान्य, गोरगरीब व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू करुन 1 रुपयात पिका विमा योजनेत जिल्हयातील 1 लाख 97 हजार 763 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांचा कल सुक्ष्म सिंचनाकडे असून 5 हजार शेतकऱ्यांना 4 हजार हेक्टरसाठी 9 कोटी 28 लक्ष रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आल्याचे ते म्हणाले.

           जिल्हयात लम्पी चर्म रोगाची 63 हजार 59 जनावरांना लागण झाली होती असे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले की, या आजाराने 917 जनावरांचा मृत्यू झाला. नुकसान भरपाई म्हणून या पाळीव जनावरांच्या मालकांना 1 कोटी 95 लक्ष रुपये वितरीत करण्यात आले. मार्च 2023 मध्ये ई-मोजणी 2.0 वापराचा पहिला मान वाशिम जिल्हयाला मिळाला आहे. जिल्हयातील सर्व गाव नकाशांचे डिजीटायझेशन पुर्ण झाले असून नकाशे संबंधित स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हयाने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आतापर्यंत 18 कोटी रुपयांचे बक्षिसे निती आयोगाने जिल्हयाला दिली असून या बक्षिसांचा विनियोग आरोग्य,कृषी व जलसंधारण विभागाने प्रस्तावित केलेल्या कामांवर केला आहे. मागील वर्षी बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील इयत्ता 8 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थींनींना मानव विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून 2919 सायकलीचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे या मुलीच्या शिक्षणात खंड पडणार नाही. असे त्यांनी सांगितले.

          यावेळी सहकारमंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते शहिद सैनिकांच्या वीर पत्नी व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या जोडीदार यांचा त्यांनी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व साडीचोळी देवून सन्मान करण्यात आला. यामध्ये वीर पत्नी श्रीमती शांताबाई यशवंत सरकटे व श्रीमती पार्वताबाई दगडू लहाने, स्वातंत्र्य सैनिकांच्या जोडीदार श्रीमती साधना जनार्धन खेडकर, श्रीमती अन्नपुर्णाबाई रामप्रसाद जोशी व श्रीमती कुबराबी ज. शे. काळू यांना सन्मानित करण्यात आले.

          ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अनंत खेळकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, लक्ष्मण मापारी, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसिलदार राहूल वानखेडे, वाशिम तहसिलदार गजेंद्र मालठाणे, लेखाधिकारी युसूफ शेख, विधी अधिकारी श्री. महामुने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, माजी सैनिक, स्काऊट गाईड, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, पत्रकार बांधव व नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक मोहन शिरसाठ यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे