पोहरादेवी व उमरी हे जागतिक आध्यात्मिक केंद्र व्हावे पालकमंत्री संजय राठोड तिर्थक्षेत्र उमरी विकास कामांची पायाभरणी
- Get link
- X
- Other Apps
पोहरादेवी व उमरी हे जागतिक आध्यात्मिक केंद्र व्हावे
पालकमंत्री संजय राठोड
तिर्थक्षेत्र उमरी विकास कामांची पायाभरणी
वाशिम दि.१० (जिमाका) देश विदेशात असणाऱ्या कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे पोहरादेवी व उमरी हे मुख्य पवित्र तिर्थक्षेत्र आहे.तिर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.येथील कामांच्या ३०० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया झाल्या आहे.भविष्यात या दोन्ही ठिकाणी भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या झाल्या असतील. तसेच इथे शैक्षणिक,आरोग्य व पर्यटन सुविधा देखील असतील.तिर्थक्षेत्र, शैक्षणिक,आरोग्य व पर्यटन सुविधांमुळे पोहरादेवी व उमरी हे जागतिक आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित व्हावे.असे प्रतिपादन पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
आज १० ऑगस्ट रोजी मानोरा तालुक्यातील उमरी येथील सामकी माता मंदिर परिसरात उमरी - पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र उमरी विकास कामांची पायाभरणी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून श्री. राठोड बोलत होते.
मंचावर धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज,सुनील महाराज,जितेंद्र महाराज,शेखर महाराज,यशवंत महाराज,जुगनू महाराज (कर्नाटक), शिवलिंग महाराज (कर्नाटक),मुरारी महाराज (कर्नाटक)अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉ .टी.सी.राठोड,बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास राठोड,माजी जि.प.अध्यक्ष दिलीप जाधव, ज्ञायक राजेंद्र पाटणी, विजय पाटील,मानोरा पंचायत समिती सभापती सुजाता जाधव,श्रीमती मोहिनी इंद्रनील नाईक, उमरीचे सरपंच कपिल पवार, पोहरादेवी सरपंच विनोद राठोड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले,आज संत रामराव महाराज असते तर त्यांना आनंद झाला असता. पोहरादेवी उमरीचा विकास झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते.त्यांच्या स्वप्नाला मूर्त रूप देण्याचे काम करण्यात येत आहे.समाजाच्या विकासासाठी त्यांची सातत्याने धडपड होती.इथल्या तीर्थक्षेत्र विकासामुळे समाजाच्या विकासाला गती मिळेल. समाजाच्या कल्याणासाठी अनेक योजना मनात आहेत.बोलण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात उतरविण्यावर आपला भर राहणार आहे.समाजाचा आशीर्वाद घेऊनच समाजाच्या विकासासाठी काम करण्यात येईल. समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी प्रयत्न आहे.समाजासाठी नॉन - क्रीमिलेयरची जाचक अट रद्द झाली पाहिजे,यासाठी पाठपुरावा सुरू आहे.प्रत्येक जिल्ह्यात व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वसतीगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याचा उपयोग समाजातील विद्यार्थ्यांना होईल.बंजारा समाजातील मूले यूपीएससी व एमपीएससी तसेच अन्य परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सूरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या अर्थात बार्टीच्या धर्तीवर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येईल,असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, स्वाधार योजनेचा लाभ भविष्यात बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे.बंजारा समाजाच्या विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाला १५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.राज्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे.नवी मुंबई येथे तीन एकर जमीन शासनाने बंजारा भवनसाठी दिली आहे.राज्याला वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसद तालुक्यातील गहूली गावाच्या विकासासाठी १०० कोटी रुपये निधी विकास आराखड्याअंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. समाजाच्या एकजुटीची ताकद आपल्याला दाखवावी लागेल. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण चालणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत यशवंत महाराज, मोहिनी नाईक व ज्ञायक पाटणी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उमरी येथे सामकी माता मंदिर परिसरात उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३२६ कोटी २४ लक्ष रुपयांच्या कामांची पायाभरणी करण्यात आली.या निधीतून मंदिर परिसर बांधकामे व सुशोभीकरण, भाविकांसाठी सोयीसुविधा,रस्ता बांधकामे,यात्री निवास,बाह्य पाणीपुरवठा योजना,अंतर्गत व बाह्य विद्युतीकरणाची कामे करण्यात येणार आहे.
पालकमंत्री श्री. राठोड यांचा धर्मगुरू महंत बाबुसिंग महाराज,यशवंत महाराज,शेखर महाराज यांनी मानपत्र,चांदीचा कडा, फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.मानपत्राचे वाचन प्रा.किशोर राठोड यांनी केले.कार्यक्रमाला उमरी व पोहरादेवी परिसरातील,जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शाम जाधव यांनी केले.संचालन प्रा. किशोर राठोड यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. अर्जुन जाधव यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment