नागरीकांशी सौजन्याने वागून कामे वेळेत पुर्ण करा श्रीमती बुवनेश्वरी एस... महसूल दिन उत्साहात साजरा. गुणवंत अधिकारी - कर्मचारी सन्मानीत


नागरीकांशी सौजन्याने वागून कामे वेळेत पुर्ण करा
                                   श्रीमती बुवनेश्वरी एस
महसूल दिन उत्साहात साजरा
गुणवंत अधिकारी - कर्मचारी सन्मानीत
        वाशिम, दि. 1 (जिमाका) : प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग काम करतो. जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या काळात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून काम केले. हा विभाग शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक नागरीकाचा महसूल विभागाशी संबंध येतो. त्यामुळे नागरीकांची कामे करतांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महसूलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नागरीकांशी मितभाषी राहून त्यांना सौजन्याची वागणूक देवून त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
       आज 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी. एम, अपूर्वा बासूर, निवासी उपजिल्हाधिकारी कैलाश देवरे, उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, तेजश्री कोरे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री ललीत वऱ्हाडे, सखाराम मुळे, व वैशाली देवकर यांची उपस्थिती होती. 
       श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, महसूल विभागाच्या कामाची तुलना इतर विभागांशी होवू शकत नाही. मोठे कामे करण्याची जबाबदारी महसूल विभाग सातत्याने पार पाडतो. महसूल विभागाकडून पुण्ण्याची कामे केली जातात. दर महिन्याच्या 1 तारखेला सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात प्रयत्न राहणार आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतनाचा लाभ निवृत्तीच्या दिवशी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सर्व कर्मचारी वर्गातून दर महिन्याचा उत्तम कर्मचारी म्हणून निवड करण्यात येईल. त्याच्या कामाची दखल घेवून इतर कर्मचाऱ्यांना उत्तम कर्मचारीसाठी प्रोत्साहीत केले जाईल. महसूल विभागाचे काम अधिकाधिक चांगले कसे होईल यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येईल. चांगले काम करणाऱ्या सहाही तहसिल कर्मचाऱ्यांची कामाची दखल घेवून त्यांना सन्मानीत करण्यात येईल. सर्वांनी टिम वर्क म्हणून काम करावे. कामात त्रुटी राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. असे त्या म्हणाल्या. 
         श्री. पवार म्हणाले, जिल्हयात मोठ्या प्रमाणात महसूलविषयक कामे करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करण्याचे काम महसूलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले आहे. केवळ महसूल सप्ताहातच नव्हे तर वर्षभर महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले काम करावे. गावोगावी जावून महसूल विभागाच्या योजनांची माहिती द्यावी. रस्त्यांचे वाद तात्काळ सोडवावे. त्यामुळे नागरीकांना त्रास होणार नाही. महसूल विभागाबाबत लोक चांगले बोलतील. कमी वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करुन नागरीकांना न्याय देण्याचे काम महसूल विभागाने करावे. असे ते यावेळी म्हणाले. 
        श्री. देवरे म्हणाले, महसूल विभागाशी सर्वांचा संबंध येतो. सर्व समस्यांना न्याय देण्याचे काम महसूल विभाग करतो. आपआपले कौशल्य वापरुन अधिकारी-कर्मचारी न्याय देण्याचे काम करतात. महान कार्य करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. हा विभाग शेवटच्या घटकापर्यत पोहचतो. शासनाच्या अनेक योजना व उपक्रम राबविण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. गरीबांपासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांचा संबंध महसूल विभागाशी येतो. शासनाचा महसूल यंत्रणेवर विश्वास आहे. त्यामुळेच या विभागावर अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
          यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, मंगरुळपीर  उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार राहुल वानखेडे, मालेगांव तहसिलदार दिपक पुंडे, मंगरुळपीर तहसिलदार रवि राठोड, नायब तहसिलदार विनोद हरणे, जी. एम. राठोड, प्रतिभा चौधरी, गजानान जवादे, लघुलेखक संवर्गातून धर्मराज चव्हाण, विनोद विसरकर, अव्वल कारकून एम.डी.नकीतवाड, संगिता काळसर्पे,  ए.ए.भोरकडे, किशोर पाकळवाड, मंडळ अधिकारी सुनिल खाडे, आर एस. पवार, एस डी. जावळे, शिवानंद कानडे, महसूल सहायक विनोद मारवाडी, रामदास ठोंबरे, ए.के. राठोड, किशोर खाडे, संदीप आडे, तलाठी विष्णू दवणे, वैशाली वानखेडे, प्रितेश पडघान, शिपाई गणेश वानखेडे, कौसरखॉ मोहम्मद खा पठाण, योगेश इंगोले, एस.के. सुपनेर, सुनिल घाटे, सिताराम खारोळे, वाहन चालक रोशन सरक, कोतवाल सचिन भगत, विजय काजळे, अंकुश शेवाळे, मिलीद ताटके, आणि पोलीस पाटील विजय आडे यांच्या समावेश आहे. ई-फेरफारमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल कारंजा उपविभागीय अधिकारी ललीत वऱ्हाडे व तहसिलदार कुणाल झाल्टे यांना देखील सन्मानीत करण्यात आले. गुणंवत पाल्यांचा यावेळी प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. 
          अमरावती विभागात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड झाल्याबद्दल गजानान उगले, तलाठी राहूल वरघट व शिपाई श्री. चक्रनारायण यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी उपविभागीय अधिकारी कारंजा ललीत वऱ्हाडे, तहसिलदार राहूल वानखेडे, कर्मचारी श्रीराम गवई, तलाठी राहूल वरघट व देविदास काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी मोहन जोशी यांनी केले. संचालन श्रीमती अडकीने यांनी तर उपस्थितांचे आभार मानोरा तहसिलदार राजेश वजीरे यांनी मानले. यावेळी विविध विभागाचे तसेच महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे