बालविवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन दया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. बाल कल्याण व जिल्हा कृती दल समिती सभा




बालविवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन दया

                                                         जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

बाल कल्याण व जिल्हा कृती दल समिती सभा

          वाशिम, दि. 18 (जिमाका) :  जिल्हयात एकही बालविवाह भविष्यात होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे. जिल्हयातील मुलामुलींची योग्य वयात लग्न झाली पाहिजे. त्याचे फायदे व बालविवाहामुळे होणारे नुकसान पालकांच्या लक्षात आणून दयावे. यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी समाजात वातावरण निर्मिती करुन बालविवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन दयावे. असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी केले.

           जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक बाल संरक्षण योजनेच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा व जिल्हा कृती दल समितीचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. विजय टेकवाणी, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अल्का मकासरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बाळासाहेब सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) संजय जोल्हे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मिनाश्री भस्मे व कारागृह अधिक्षक प्रदिप इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, जिल्हयात बालगृह व शिशुगृहाची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव महिला व बालकल्याण आयुक्तालयाला सादर करावा. जिल्हयात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ याबाबतचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. शाळांमधून याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. वन स्टॉप सेंटरमध्ये समुपदेशकाच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे त्या व्यक्तींचे समुपदेशन करावे. असे श्रीमती बुवनेश्वरी यांनी सांगितले.

          बालविवाह रोखण्यासाठी शिक्षकांमधून मास्टर ट्रेनर्स तयार करावे. मुलामुलींचे शाळांमधून योग्य वयातच लग्न करण्याबाबत प्रबोधन करावे. असे सांगून श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या की, 5 व्या वर्गापासूनच्या 10 मुलींचा गट तयार करुन त्यांच्याशी शिक्षकांनी सहज गप्पा मारुन त्यांना योग्य वयातच लग्न करण्यास प्रोत्साहन दयावे. समाजात बालविवाह होणार असल्याची बाब लक्षात आणून दयावी. त्यामुळे बालविवाह रोखता येईल. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, यंत्रणा व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रोत्साहन दयावे. असे त्या म्हणाल्या.

         न्या. श्री. टेकवाणी म्हणाले, बालविवाह रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण फ्लेक्स लावणार आहेत. त्या फ्लेक्सवर बालविवाह रोखण्यासाठीचा संपर्क क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे जर कुठे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली तर तात्काळ त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून होणारा बालविवाह रोखण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

           जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. सुर्यवंशी यांनी सभेत जिल्हा बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती, वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समिती, जिल्हा परीविक्षा समिती, जिल्हा कृती दल व बाल विवाहाबाबतची माहिती यावेळी दिली.

          जिल्हयात ऑक्टोबर 2022 ते जून 2023 या कालावधीत पोस्कोची 36 प्रकरणे घडली असून या प्रकरणात समुपदेशन करुन वैद्यकीय सेवा व मनोधैर्य योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. 17 बालविवाह समुपदेशनातून रोखण्यात आले. 6 बाल कामगारांना बाल कल्याण समितीने त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. जिल्हयातील 494 गावात गाव बाल संरक्षण समित्या गठीत केल्या आहे. बालसंगोपन योजनेचा लाभ 151 बालकांना देण्यात आला आहे. बालकांचे कायदे व हक्क याबाबत प्रचार प्रसिध्दी कार्यशाळेतून करण्यात आली. बाल कामगार निर्मुलनासाठी उपक्रम राबविले जाणार आहे. 217 बालकांना प्रत्येक 10 हजार रुपये या प्रमाणे बाल न्याय निधी वितरीत करण्यात येत आहे. कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 4 बालकांना अनाथ प्रमाणपत्र वाटप केल्याची माहिती श्री. सुर्यवंशी यांनी दिली. यावेळी संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी उपस्थितांना बालविवाह रोखण्याची शपथ दिली.  

          सभेला जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. ए.एस. बाकलीवाल, बाल कल्याण समिती सदस्या डॉ. मंजुश्री जांभरुणकर, ॲड. अनिल उंडाळ, बालाजी गंगावणे, विनोद पट्टेबहादूर, बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा. एस.एम. शिंदे, ॲड. प्रतिभा वैरागडे, महिला व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रा. डॉ. शुभांगी दामले, आरोग्य विभागाचे डॉ. मोबीन खान, बाल विकास प्रकल्प अधिकारी (वाशिम) प्रियंका गवळी, श्री. नितीन लुंगे, श्रीमती एस.एस. देशमुख (मालेगांव), जिल्हा परिवीक्षा अधिकारी एन.एस. जटाळे, गणेश ठाकरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी जिनसाजी चौधरी, संरक्षण अधिकारी भगवान ढोले, चाईल्ड लाईन वाशिमचे अमोल देशपांडे व सखी वनस्टॉप सेंटरच्या व्यवस्थापक अर्चना वानखेडे यांची उपस्थिती होती.

                                                                      *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे