मल्टीलेयर फार्मिंग शेतकरी प्रशिक्षण :महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- Get link
- X
- Other Apps
मल्टीलेयर फार्मिंग शेतकरी प्रशिक्षण
महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम, दि. 09 (जिमाका) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मल्टीलेयर फार्मिंग शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन ८ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घावडे यांची उपस्थिती होती.
जिल्हयात महिला अन्नसुरक्षा गटाची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित शेतकरी गटातील प्रतिनिधी महिला या प्रशिक्षणास उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा उद्देश, अन्न सुरक्षा गटाची स्थापना, मल्टीलेयर फार्मिंगमध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध भाजीपाल्यांचे व विविध फळझाडे, औषधी वनस्पतींचे आहारातील महत्व याविषयी माहिती तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी दिली.
आत्माअंतर्गत अन्नसुरक्षा गटास भाजीपाला रोपे, बियाणे, फळझाडे व रोपे साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते उत्कृष्ट दर्जाचे असल्याने हा भाजीपाला योग्य पद्धतीने लावून त्याचा सदुपयोग करुन घ्यावा. असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनात महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.प्रशांत घावडे यांनी केले. विविध भाजीपाला व फळझाडे यांच्या लागवड पद्धती व वाणांचे गुणवैशिष्ट्ये याविषयी डॉ. घावडे यांनी सविस्तर माहिती दिली.
आपल्या परिवाराची पोषणाची जबाबदारी महिलांवर असते. त्यांना सकस अन्न कसे मिळेल याकडे महिला सातत्याने लक्ष देतात. त्यामुळे विशेषतः महिलांनी अन्न सुरक्षा गटांमार्फत बहुस्तरीय शेती पद्धतीचा अवलंब करून परसबाग तयार करावी. बहुस्तरीय शेती पद्धतीचा म्हणजे मल्टी लेयर फार्मिंग करून परसबाग निर्मितीद्वारे ९६ अन्नसुरक्षा गटातील जवळपास ९६० ते १००० महिलांना याचा लाभ मिळणार आहे. परसबागेमध्ये लागवड केलेल्या भाजीपाल्यापासून महिलांना सुरक्षित विषमुक्त अन्न उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये कंदवर्गीय भाज्या, पालेभाज्या व फळभाज्या, वेलवर्गीय भाजीपाला, फळझाडे, औषधी वनस्पती एक गुंठे क्षेत्रावर त्याची पद्धतशीरपणे लागवड करून कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त भाज्या व फळे यांचे पीक घेऊन कुटुंबाचे पोषण होईल अशा पद्धतीने परसबाग उभारणे हा या मागचा उद्देश आहे. या उद्देशास यशस्वी करण्याकरीता सर्व महिला गटांनी साथ द्यावी. असे आवाहन अनिसा महाबळे यांनी केले.
जिल्ह्यातील अन्नसुरक्षा गटाच्या महिला प्रतिनिधी प्रशिक्षणाला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात परसबाग बियाणे व फळझाडे रोपे किटचे वाटपसुद्धा करण्यात आले. संचालन जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. यशस्वीतेसाठी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन इंगोले, विजय दुधे, रामेश्वर पाटील, संजय राऊत, आत्मा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment