भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांच्या नांव नोंदणीसाठी गावपातळीवर आता विशेष शिबीर




भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांच्या नांव नोंदणीसाठी

गावपातळीवर आता विशेष शिबीर

           वाशिम, दि. 02 (जिमाका) :  लोकशाही व्यवस्थेत मतदार हा महत्वाचा घटक आहे. कोणताही मतदार हा मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी आता भटक्या विमुक्त जमातीच्या मतदारांची नांव नोंदणी करण्यासाठी संबंधित गावांमध्ये विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.  जिल्हयातील दुर्गम भागातील भटक्या विमुक्त जमातीमधील मतदारांची नांव नोंदणी करण्यासंदर्भात आज 2 ऑगस्ट रोजी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिल्हयातील सर्व भटक्या विमुक्त जमातीमधील मतदारांची १०० टक्के नांव नोंदणी करण्याबाबतचे त्यांनी निर्देश दिले.
          जिल्हयातील सर्व तालुक्यातील भटक्या विमुक्त जमातीमधील 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरीकांची मतदार म्हणून १०० टक्के नांव नोंदणी करण्याकरीता तालुक्यातील ज्या गावात हा समाज वास्तव्यास आहे, त्या गावांमध्ये मतदार नांव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या विशेष शिबिराचे आयोजन निवडणूक नायब तहसिलदार, निवडणूक लिपीक, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व ऑपरेटर यांचे गावनिहाय पथक तयार करून तालुक्यातील भटक्या विमुक्त जमाती असलेल्या गावात १०० टक्के नांव नोंदणी पुर्ण करण्यासोबतच भटक्या विमुक्त जमातीचे लोक दिर्घकाळ एकाच ठिकाणी वास्तव्य करत नसल्यामुळे त्यांचेकडे मतदार म्हणून नांव नोंदणी करण्याकरीता पुरेसे दस्तऐवज नसल्यास त्यांचेकडून स्वयंघोषणापत्र भरून घेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. स्वयंघोषणापत्राचा नमुना त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भटक्या विमुक्त जमातीचे नागरीक एकाच ठिकाणी दिर्घकाळ वास्तव्य करीत नसल्यामुळे ते ज्या गावात स्थलांतरीत होतील त्याठिकाणी सुध्दा विशेष शिबिरांचे आयोजन करून नांव नोंदणी पुढील १० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
          विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची कालमर्यादा संपल्यानंतर सुध्दा ही नाव नोंदणी निरंतर सुरू ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून या जमातीचा एकही 18 वर्ष पूर्ण झालेला नागरीक नाव नोंदणीपासून वंचीत राहणार नाही. नाव नोंदणीचा कार्यक्रम राबवित असतांना जिल्हयातील भटक्या विमुक्त जमातीकरीता कार्य करणारे समाजसेवक संतोष जाधव (9307677395) व कारंजाचे राजु अवताडे (8975230676) यांचे सहकार्य घ्यावे. जिल्हयातील विमुक्त भटक्या जमातीची लोकसंख्या असलेल्या गावांच्या नावाची यादी नांव नोंदणी करणाऱ्या पथकाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या यादीनुसार तसेच या यादी व्यतिरिक्त अन्य भटक्या विमुक्त जमाती राहत असलेल्या जिल्हयातील सर्व गावांमधील नागरीकांची मतदार म्हणून नांव नोंदणी या विशेष शिबीरामध्ये करण्यात येणार आहे. तरी भटक्या विमुक्त जमातीमधील कोणताही 18 वर्ष पूर्ण झालेला नागरीक मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही. याबाबतची दक्षता घेण्यात येत असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजश्री कोरे यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे