तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा पालकमंत्री संजय राठोड ..यंत्रणांची आढावा सभा

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा 
               पालकमंत्री संजय राठोड 

यंत्रणांची आढावा सभा 

वाशिम दि ११(जिमाका) बंजारा समाज बांधवांचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी-उमरी येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडयाअंतर्गत मोठा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या आराखडयाअंतर्गत करण्यात येणारी कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी.असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले 
               १० ऑगस्ट रोजी नंगारा म्युझियम पोहरादेवी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याशी संबंधित यंत्रणांचा आढावा घेताना पालकमंत्री श्री राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी,सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर व उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री राठोड म्हणाले, या आराखड्या उमरी तीर्थक्षेत्रातील विकास कामांना आजपासून सुरुवात झाली आहे.विकास आराखडयाअंतर्गत ज्या जागांचे हस्तांतरण करून घ्यायचे आहे,त्याचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.उमरी येथे तीन हेलिपॅड तयार करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येणारी कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावी.नंगारा म्युझियममधील अंतर्गत व बाह्यभागातील कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले. 
              विकास आराखडयाअंतर्गत करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या ठिकाणी सौर उर्जेवर भर द्यावा असे सांगून श्री राठोड म्हणाले, नवीन सौर ऊर्जा निर्मिती युनिट जवळपास सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करावा.दर आठवड्याला जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांच्या कामाचा नियमित आढावा घ्यावा असे ते यावेळी म्हणाले. 
                 जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वर यांनी विकास आराखडयात  करण्यात येत असलेला कामाच्या प्रगतीची माहिती दिली. आराखड्यातील सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील याकडे आपले लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.    
               श्री.जोशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. या आराखड्यातील विद्युतीकरणासह विविध कामे करण्यासाठी ग्रामविकास विभागाने १० जानेवारी २०२३ रोजी ४९३ कोटी ६९ लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली असून १२५ कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे.१६ मे २०२३ रोजी ३६४ कोटी ६९ लक्ष रुपयांच्या कामास तांत्रिक मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी विकास आराखड्याअंतर्गत त्यांच्या विभागाकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती देऊन कामाच्या सद्यस्थितीबाबत अवगत केले.     
               आढावा सभेला उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, नितीन चव्हाण,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले,जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.विनय राठोड,कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता निलेश राठोड,जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखडे,तहसीलदार राजेश वजीरे व गटविकास अधिकारी श्री. बायस यांची यावेळी उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे