निर्यात बंधू योजना उद्योजक,निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यशाळा संपन्न

निर्यात बंधू योजना 

उद्योजक,निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यशाळा संपन्न 

वाशीम दि.३( जिमाका) जिल्ह्यातील उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची निर्यात बंधू योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र वाशिम आणि विदेश व्यापार महासंचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा २ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली.

              कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. होत्या. नागपूर येथील विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहाय्यक महासंचालक स्नेहल ढोके,जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत,उद्योग संचालनालयाचे उपसंचालक वाय.आर. सारणीकर व उद्योग अधिकारी ओ.के.पायघन यांची प्रमुख उपस्थिती होती.
             
जिल्ह्यात विविध उद्योगांना चालना मिळून उद्योगातील उत्पादित होणाऱ्या मालाची उद्योजक, निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी विदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात करावी.यासाठी केंद्र सरकारचे विदेश व्यापार महासंचालनालय सहकार्य करण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी  यावेळी म्हणाल्या.
                   
विदेश व्यापार महासंचालनालयाच्या सहायक महासंचालक श्रीमती ढोके यांनी वाशिम जिल्ह्यातून निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने काय करता येईल याबाबतची विस्तृत माहिती सादरीकरणातून दिली. जिल्हा निर्यात केंद्राचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्थानिक उद्योजकांना निर्यात यासाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू असल्याचे सांगून, विदेश व्यापार महासंचालनाच्या नागपूर व्हीसीलिंकबद्दल देखील माहिती दिली. त्यामुळे निर्यातदार आणि नवीन येणाऱ्यांचे प्रश्न थेट सोडविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.यापुढेही जिल्ह्यात अशाप्रकारच्या कार्यशाळा घेण्यात येतील असे त्या म्हणाल्या.

 बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रादेशिक अधिकारी यांनी निर्यातदारांना निर्यातीसाठी मदत करणार तसेच निर्यातीसाठी बँक अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. 

पोस्ट अधीक्षक यांनी पोस्टाकडे निर्यातीसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थित उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कार्यशाळेला उद्योजक, नवउद्योजक, निर्यातदार व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे ६८ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे