रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन
- Get link
- X
- Other Apps
रेशीम शेतीबाबत
शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन
वाशिम, दि. 09 (जिमाका) : रेशीम शेतीशाळा वर्गाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे यांनी भेट दिली. कृषी आणि कृषी संलग्न विभागासाठी एखाद्या नवीन तंत्रज्ञान/ विषय शेतकऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी शेतीशाळा आयोजित केल्या जातात. एका शेती शाळेत सहा वर्ग विविध विषयाबाबत घेतले जातात. असाच नवीन कृषीपूरक व्यवसायाचा शेतकऱ्यांनी अंगीकार करावा यासाठी आत्मा आणि जिल्हा रेशीम कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीम शेती शाळेचे आयोजन रिसोड तालुक्यातील मोप येथील शेतकरी किशोर नरवाडे यांच्या तुती लागवड असलेल्या रेशीम प्रकल्पावर करण्यात आले.
१२ जुलै २०२३ रोजी प्रथम वर्ग सुरू करण्यात आला. या वर्गात तुती लागवड, तुतीच्या सुधारित जाती, लागवड अंतर, प्रती एकर झाडांची संख्या, खत व पाण्याचे नियोजन, एकरी तुती पानाचे उत्पादन, तुतीवरील कीड व रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तुती रोपांची लागवड, बुरशीनाशकांचा उपयोग करण्याबाबतचे प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.
२८ जुलै २०२३ रोजी दुसरा वर्ग बाल कीटक संगोपन यामध्ये तापमान, आर्द्रता, पानाची प्रत, लागणारी जागा, शय्या निर्जंतुकीकरण याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ४ ऑगस्ट २०२३ रोजी तिसरा वर्ग प्रौढ कीटक संगोपनमध्ये लागणारी जागा, खाद्याचे प्रमाण, तापमान व आर्द्रता यांचे महत्व, रेशीम कीटक रोगमुक्त ठेवण्यासाठी चुना व निर्जंतुक औषधांचा वापर याबाबत सविस्तर माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी सु. प्र.फडके यांनी दिली. ४ थ्या वर्गात कोष अवस्थेतील अळी ओळखणे, चंद्रिका टाकने इत्यादीबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी श्रीमती महाबळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आता शेतकरी गट तयार करून शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजेत. यापुढे शासकीय अनुदान देण्यासाठी शेतकरी गटाला प्राधान्य देण्यात येईल. गटाचा फायदा सर्वानाच होतो. उत्पादन खर्चात कपात होते, त्यामुळे अधिक फायदा होतो. तंत्रज्ञानसुध्दा तात्काळ उपलब्ध होते. तांत्रिक अडचणींवर मदत त्वरित मिळते. रेशीम शेतकऱ्यांनीसुध्दा रेशीमचा गट तयार करावा.
मोप आणि परिसरातील गावात मनरेगा व सिल्क समग्र या योजनेतून २० शेतकऱ्यांनी रेशीम शेती उद्योग करण्याचे निश्चित केले आहे आणि तुती रोप आणून लागवड केली आहे. यावेळी प्रकल्प संचालिका श्रीमती महाबळे यांनी नवीन तुती लागवडीची पाहणी केली. सर्व रेशीम उद्योजकांनी यावेळी चांगला प्रतिसाद दिला व मान्यवरांचे आभार मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment