सलोखा योजनामुद्रांक शुल्क व नोंदणी फी होणार माफ




सलोखा योजना

मुद्रांक शुल्क व नोंदणी फी होणार माफ

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : शेतजमिनीचा ताबा, वहीवाटीबाबत आपआपसातील वाद मिटविण्यासाठी समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी एका शेतकऱ्यांच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकांचे अदलाबदल दुरुस्तीसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र १ हजार रुपये व नोंदणी फी नाममात्र १ हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्याबाबत सलोखा योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. एकाच गावात जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांकडे परस्पर मालकी व ताबा असल्याबाबतचा पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी करून दस्त नोंदणीच्या ऐवजी पंचनामा दस्तास जोडणे बंधनकारक राहणार आहे.

            सलोखा योजना दोन वर्षासाठी असणार आहे. शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान 12 वर्षापासून असायला हवा. अकृषक, रहिवासी तसेच वाणिज्यक वापराच्या जमिनीसाठी ही योजना लागू नाही. या योजनेमुळे आपआपसातील पिढीजात वैरभावना संपून ताबा व मालकी याबाबतचा संभ्रम दूर होऊन शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल व जमिनीच्या विकासाला चालना मिळण्यासोबतच शेतकऱ्यांचे स्वतः:चे आणि देशाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल. तसेच न्यायालयीन दावे निकाली काढण्यास देखील मदत होणार आहे. सलोखा योजना शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपआपसातील वाद मिटवावेत. सामाजिक सौख्य सौहार्द वाढविण्यासाठी हातभार लावावा. याकरीता संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

                                                                                                     *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश