राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या“ प्रति थेंब अधिक पीक ” घटकाचा3427 शेतकऱ्यांना लाभअनुदानाचे 5 कोटी 98 लक्ष रुपये बँक खात्यात जमा




राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या

 प्रति थेंब अधिक पीक  घटकाचा

3427 शेतकऱ्यांना लाभ

अनुदानाचे 5 कोटी 98 लक्ष रुपये बँक खात्यात जमा

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती न करता त्याला संरक्षित सिंचनाची जोड देवून प्रति थेंबातून अधिक पीक या घटकाचा राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन 2022-23 या वर्षात 3427 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. या लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात 5 कोटी 98 लक्ष 72 हजार 145 रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

            कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रति थेंब अधिक पीक या घटकाच्या माध्यमातून 2787 शेतकऱ्यांच्या शेतात तुषार सिंचन संच बसविण्यात आले. त्यामुळे या शेतकऱ्यांची 2090 हेक्टर शेती तुषार सिंचनाखाली येण्यास मदत झाली असून त्यामुळे प्रति थेंबातून अधिक पीक घेण्याचे उदिष्ट साध्य होणार आहे. तुषार सिंचन संचासाठी 2787 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची 3 कोटी 54 लक्ष 73 हजार 91 रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

           ठिबक सिंचन संचाचा लाभ जिल्हयातील 640 शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे 480 हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली येण्यास मदत झाली आहे. पिकाच्या मुळाशी थेट थेंबाव्दारे पाणी मिळणार असल्यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे. त्यामुळे पाण्याची मोठया प्रमाणात बचत होणार आहे. 640 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे 2 कोटी 43 लक्ष 99 हजार 53 रुपये जमा करण्यात आले आहे.

           राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ‘ प्रति थेंब अधिक पीक ’ या घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडिबीटी या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज केले. पारदर्शकपणे ऑनलाईन सोडत पध्दतीतून 5 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात ‘ प्रति थेंब अधिक पीक ’ या घटकाचे 5 कोटी 98 लक्ष 72 हजार 145 रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.

          अल्प व अत्यल्प भूधारक या घटकाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत 55 टक्के आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 25 टक्के अनुदान देण्यात आले आहे. तर बहु भूधारक लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत 45 टक्के आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत 30 टक्के अनुदान देण्यात आले आहे.

          अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पीक या घटकाअंतर्गत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना मिळून सुक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्के अनुदान तर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना - प्रति थेंब अधिक पीक या घटकाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मिळून सुक्ष्म सिंचन संचासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येते.    

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश