मुख्यमंत्र्यांनी साधला आनंदाचा शिधा व शिवभोजनच्या जिल्हयातील लाभार्थ्यांशी संवाद



मुख्यमंत्र्यांनी साधला

आनंदाचा शिधा व शिवभोजनच्या जिल्हयातील लाभार्थ्यांशी संवाद

        वाशिम, दि. 13 (जिमाका) : गुढीपाडव्यानिमित्त वाटप करण्यात आलेल्या आणि 14 एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधाच्या आणि शिवभोजन केंद्रात भोजन करणाऱ्या जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातून दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते.

            वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील दुरदृश्य प्रणाली कक्षात जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, काही शिवभोजन केंद्राचे संचालक, रास्त भाव दुकानदार, आनंदाचा शिधाचे व शिवभोजन केंद्राचे काही लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

             वाशिम येथील गणेशपेठ भागातील रहिवाशी असलेल्या श्रीमती सुनंदा आंबेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. संवाद साधतांना त्या म्हणाल्या, मला गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा किट रास्त भाव दुकानातून केवळ 100 रुपयात मिळाल्याने मला गुढीपाडवा या सणाच्या दिवशी काहीतरी गोड अन्न करुन हा सण साजरा करता आला. असे आनंदाचे क्षण आपण आमच्या जीवनात आणल्याबद्दल त्यांनी मनापासून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

            शिवभोजन केंद्रातील भोजनाचा लाभ घेतलेल्या  अल्लाडा प्लॉट येथील रहिवाशी कल्पना वानखेडे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून शिवभोजन केंद्रातून मिळणारे भोजन चांगल्या प्रकारचे असल्याचे सांगितले व दोन्ही वेळचे भोजन या केंद्रातून मिळाले पाहिजे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

            जिल्हयात गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीनिमित्त लाभार्थ्यांसाठी 2 लक्ष 50 हजार 807 आनंदाचा शिधाच्या किटची आवश्यकता होती. त्यापैकी सर्वच किट जिल्हयाला प्राप्त झाल्या आहेत. जिल्हयातील एकूण 776 रास्त भाव दुकानातून ही आनंदाचा शिधा किट वितरीत करण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांना गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उर्वरित किटचे वितरण करण्यात येत आहे. रास्त भाव दुकानांना वितरण करण्यात आलेल्या आनंदाचा शिधा किटचे प्रमाण 86.60 टक्के इतके आहे.

            आज जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात आनंदाचा शिधा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे व सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे प्रामुख्याने उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश