जिल्हा विकास आराखडयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांचा आढावा
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा विकास आराखडयाबाबत
जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणांचा आढावा
वाशिम, दि. 17 (जिमाका) : देशाला सन 2047 पर्यंत विकसीत भारत करण्याचा संकल्प केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केला आहे. सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्ट निश्चित केले आहे. सोबतच सन 2030 पर्यंत शाश्वत विकासाचे उद्दिष्टे सुध्दा साध्य करण्याचा मानस आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हयावर लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने विविध यंत्रणांकडून जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या संदर्भाने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज वाकाटक सभागृहात यंत्रणांचा आढावा घेतला.
सभेला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. कानफाडे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
श्री. षण्मुगराजन म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राज्याची अर्थव्यवस्था ही सर्वात मोठी आहे. देशाच्या सकल उत्पन्नामध्ये राज्याचा वाटा 15 टक्के आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व विकसीत भारतामध्ये राज्याचा वाटा मोठा असावा यासाठी जिल्हयाला केंद्रस्थानी ठेवून विशिष्ट नियोजन आपल्याला करायचे आहे. जागतिक मानके साध्य करण्यासाठी आकांक्षा असलेले जिल्हे अन्य जिल्हयासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जिल्हयातील सामाजिक व आर्थिक परिस्थीती आणि नैसर्गिक संसाधनातील असमानता आणि झपाटयाने होणाऱ्या शहरीकरणाच्या आव्हानांना समोर जाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येक यंत्रणेने जिल्हा विकास आराखडे तयार करावे. असे श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.
ज्या विभागामध्ये विकासाच्या संधी आहे हे ओळखून त्याबाबत सुक्ष्म नियोजन आराखडा यंत्रणेने तयार करावा. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, यंत्रणांनी आपापल्या विभागामार्फत कोणकोणती कामे करता येतील यासाठी विभागाशी संबंधित असलेल्या तज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. यंत्रणेकडे कोणत्या उणिवा आहे, त्या दूर करण्यासाठी 25 एप्रिलपर्यंत यंत्रणांनी नियोजन करावे. स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करुन घेवून जिल्हयाचा विकास आराखडा तयार करावा. विविध क्षेत्रात विकासात्मक वाढ करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाचा 5 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment