अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांची एरंडा येथील बांधावरच्या प्रयोगशाळेला भेट
अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांची एरंडा येथील बांधावरच्या प्रयोगशाळेला भेट
वाशिम दि.१(जिमाका) राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन वाढ व मूल्य साखळी विकास योजना उत्पादन वाढ प्रकल्प सन २०२२-२३ अंतर्गत अमरावती तालुक्यातील ७० शेतकऱ्यांनी ३१ मार्च रोजी मालेगाव तालुक्यातील एरंडा येथील जय किसान शेतकरी गटाच्या शेतातील बांधावरील प्रयोगशाळेला भेट दिली. शेतकऱ्यांच्या भेटीदरम्यान प्रयोगशाळेचे संचालक शेतकरी दीपक घुगे यांनी प्रयोगशाळेत तयार करण्यात येणार्या जैविक कृषी निविष्ठांची माहिती दिली. जैविक खते निर्मिती व जैविक कीड नियंत्रण याबाबत विस्तृत मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. श्री घुगे यांनी भेटीवर आलेल्या शेतकऱ्यांना प्रयोगशाळेच्या उभारणीपासून तर उत्पादनापर्यंतची विस्तृत माहिती दिली.प्रयोगशाळेची कार्यपद्धती याबाबत माहिती देऊन जैविक खत निर्मितीबाबतचे प्रात्यक्षिक दौऱ्यावर आलेल्या शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी अमरावती तालुक्यातील नांदगाव/पेठ येथील भेटीवर आलेले शेतकरी मनोज गाभणे,संतोष गडेकर व उमेश ठाकरे यांनी श्री. घुगे यांना प्रश्न विचारून शंकांचे निराकरण केले. भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी सहाय्यक वासुदेव चव्हाण यांनी केले.आभार कृषी सहाय्यक नितीन व्यवहारे यांनी मानले.
Comments
Post a Comment