सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा शेतकऱ्यांसाठी वरदान अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार विजेत्या शेतकरी गटांचा सत्कार
- Get link
- X
- Other Apps
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा शेतकऱ्यांसाठी वरदान
अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार
विजेत्या शेतकरी गटांचा सत्कार
वाशिम, दि. 11 (जिमाका) : शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येत आहे. प्रशिक्षण आणि डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडविण्यास मदत होत आहे. शेती करीत असतांना शेतकरी एकत्र आल्यावर निविष्ठा खरेदीमध्ये बचत होत आहे. विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने पिकावर अतिरिक्त पडणारे रसायनाचे प्रमाण कमी होऊन अन्नधान्यांमध्ये येत असलेल्या रसायनाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. अतिरिक्त रसायनामुळे वाढते कर्करोगाचे प्रमाण खूप धोकादायक आहे. यामुळे स्पर्धेचा आधार घेत ज्ञानाच्या बळावर किमान पिकावर व मातीवर पडणारे रसायन कमी होण्यास मदत होणार आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून चालू असलेली सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी व्यक्त केले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2022 मध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) व मंगरूळपीर तालुक्यातील शेतकरी गटांनी पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षण घेऊन व डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून कृषी विभाग व विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शेतीवरला व्यर्थ होत असलेला खर्च कमी करून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मदतीने नैसर्गिक कीड व्यवस्थापन करत शेतीमधील नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या उत्पन्नात भरघोस अशी वाढ केली. या शेतकरी गटांच्या कार्याची पाहणी करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी गटाला 12 मार्च रोजी बालेवाडी पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
याच धर्तीवर आपल्या वाशीम व अकोला जिल्ह्यातील सन्मानित शेतकरी गटांचा वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 10 एप्रिल रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. पवार बोलत होते. यावेळी पाणी फाउंडेशन चे प्रमुख मार्गदर्शक नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे व पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, स्मार्ट प्रकल्पाचे समन्वयक संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, संतोष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. ननावरे म्हणाले, सत्यमेव जयते फार्मर कपचे चालू असलेले निवासी प्रशिक्षणात शेतकरी बांधवांनी तसेच कृषी विभागातील कर्मचारी यांनी अवश्य भाग घ्यावा. फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून गटशेती करीत असतांना ज्ञान व एकीच्या बळावर आपल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीवरील खर्च कमी करून उत्पादकता वाढवण्यास यश प्राप्त करणाऱ्या शेतकरी गटांचा आज आपण सन्मान या ठिकाणी करीत आहोत. खऱ्या अर्थाने फार्मर कप 2023 ही स्पर्धा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील कारंजा (लाड) व मंगरूळपीर तालुक्यातील संपूर्ण गावाचा या स्पर्धेमध्ये समावेश आहे. परंतु पाणी फाउंडेशनचे चालू असलेले निवासी प्रशिक्षण आपण जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत आपले गाव स्पर्धेत राहणार नाही. याकरीता सर्वांनी चालू असलेल्या निवासी प्रशिक्षणाला जाऊन आपल्या गावात चांगले शेतकरी गट तयार करून एकी व ज्ञानाच्या बळावर आपण समृद्धीकडे नक्की जाऊ शकतो. असे त्यांनी सांगितले.
श्री. हिंगे म्हणाले, फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अनेक गावातून शेतकरी प्रशिक्षण घेऊन आपल्या गावात गट तयार करीत आहे. एकीच्या व ज्ञानाच्या बळावर आपल्या शेतीमध्ये विक्रम प्रस्थापित करत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतांना दिसत आहे. असे ते म्हणाले.
श्री. तोटावार म्हणाले, शेतकरी बांधवांनी गट शेतीच्या माध्यमातून एकत्र येऊन शेतीवरील अनेक समस्या सोडविणे शक्य आहे. यामध्ये शेतीवरील निविष्ठा एकत्रित खरेदी केल्यास खर्चामध्ये बचत होऊ शकते. तसेच ज्ञान व नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होऊन मूल्यवर्धनाच्या दृष्टीने पाऊल टाकत आपण शेतीमध्ये समृद्धी आणू शकतो. असे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन बार्शीटाकळी संघपाल वाहूरवाघ, तालुका समन्वयक अकोट जीवन गावंडे, तालुका समन्वयक कारंजा लाड रवींद्र लोखंडे, तालुका समन्वयक मंगळूपिर सुभाष गवई, कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी, कृषी प्रवेक्षक, कृषी सहाय्यक उपस्थित होते.
सन्मानपत्र शेतकरी गटासोबत कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी मंडळ अधिकारी कृषी प्रवेक्षक कृषी सहाय्यक यांचाही सन्मान. परिवर्तन शेतकरी गट वाठोडा, ता. वरुड जि. अमरावती, एकता शेतकरी उत्पादक गट मिर्जापुर, ता. आकोट जि. अकोला, समता महिला शेतकरी गट पाराभवानी, ता. बार्शीटाकळी जि.अकोला, माऊली शेतकरी गट नागी, ता. मंगरूळपीर जि.वाशिम, विजयपथ शेतकरी गट जयपुर, ता. कारंजा जि.वाशिम, एकता शेतकरी गट विळेगाव, ता. कारंजा जि.वाशिम, बळीराम शेतकरी गट दोनद (बु), ता. कारंजा जि.वाशिम, जय ज्योती जय क्रांती शेतकरी गट उंबर्डाबाजार, समृद्ध शेतकरी गट जांब, ता. मंगरूळपीर जि.वाशिम, अर्णवी शेतकरी गट चिंचाळा, ता. मंगरूळपीर जि.वाशिम, नेचर फार्म शेतकरी गट जुनून (बु), ता. मंगरूळपीर जि.वाशिम, नवअंकुर शेतकरी गट लखमापूर, ता. मंगरूळपीर जि.वाशिम व राजश्री शाहू महाराज शेतकरी गट सायखेडा, ता. मंगरूळपीर जि.वाशिम यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक विभागीय समन्वयक सुभाष नानवटे यांनी केले. संचालन देव इंगोले यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment