समृद्धी महामार्गकारंजा इंटरचेंजवर आतापर्यंत १५८ वाहन चालकांचे समुपदेशन तर ४४ वाहन चालकांवर कारवाई
समृद्धी महामार्ग
कारंजा इंटरचेंजवर आतापर्यंत १५८ वाहन चालकांचे समुपदेशन तर ४४ वाहन चालकांवर कारवाई
वाशिम दि.२२ (जिमाका) डिसेंबर २०२२ मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई दरम्यानचा नागपूर - शिर्डी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. या महामार्गावर छोट्या वाहनांची वेगमर्यादा ताशी १२० कि.मी तर जड वाहनांसाठी ताशी ८० कि.मी.निश्चित केली आहे. ही मर्यादा निश्चित केली असली तरी काही वाहन चालक त्याचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.समृद्धीवरील अपघाताला आळा घालण्यासाठी आरटीओ विभाग काम करीत आहे.या महामार्गावरील कारंजा येथील इंटरचेंजवर आतापर्यंत १५८ वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले असून ४४ वाहन चालकांवर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय,वाशिमच्या वतीने कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातून जवळपास ९६ किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जातो. कारंजा,शेलुबाजार आणि मालेगाव तालुक्यातील वारंगी येथे या महामार्गावर इंटरचेंज आहे.वाशिम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक हे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्या मार्गदर्शनात कर्तव्य बजावत असून कारंजा येथील इंटरचेंजवर वाहन चालकांचे समुपदेशन करण्याचे काम करीत आहेत. तर काही वाहनांवर कारवाई देखील करीत आहे. एवढेच नव्हे तर या महामार्गावर ड्युटीवर असलेल्या निरीक्षकांकडून आतापर्यंत ४४ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन दंड वसूल करण्यात आला आहे.
२१ एप्रिल रोजी कारंजा येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ४२ वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले. दोन वाहनांचे टायर खराब असल्यामुळे समृद्धी महामार्गावर धावण्यास प्रतिबंध करण्यात आला. एक वाहनाचा रिफ्लेक्टर टेप लावण्यात आला.मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणाऱ्या पाच वाहनांवर, लेनची शिस्त न पाळणाऱ्या पाच वाहनांना,एका वाहनावर अनधिकृतपणे वाहन पार्किंग केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर एका वाहनावर रिफलेक्टर नसल्यामुळे कारवाई करण्यात आली.
२२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १५८ वाहनचालकांचे समुपदेशन, सात वाहनांना समृद्धीवर टायर जीर्ण असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला.आठ वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले.७ वाहन चालकांचे संगणक प्रणालीद्वारे समुपदेशन करण्यात आले.चार वाहनांनी लेनची शिस्त न पाळल्याने व एका वाहनाला रिफ्लेक्टर नसल्यामुळे समुपदेशन करण्यात आले.
आतापर्यंत कारंजा येथील इंटरचेंजवर वेग-मर्यादेचे पालन न करणाऱ्या १७,लेन कटिंग करणाऱ्या १९,नो पार्किंगच्या ५ आणि रिफ्लेक्टर नसलेली ३ वाहने अशा एकूण ४४ वाहन चालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाशिमचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.
Comments
Post a Comment