गो-आधारीत शेती व आपत्ती व्यवस्थापनाबाबतकार्यशाळा उत्साहात




गो-आधारीत शेती व आपत्ती व्यवस्थापनाबाबत

कार्यशाळा उत्साहात

        वाशिम, दि. 17 (जिमाका) : कृषी विभाग, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने गो- कृपा अमृत शेतीतील एक पारंपारिक पद्धती या विषयावर आज १७ एप्रिल रोजी नियोजन भवन सभागृह, वाशिम येथे कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून बन्सी गीर गोशाळा अहमदाबाद गुजरात येथील श्री गोपालभाई सुतारिया यांची तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार व प्रगतीशील शेतकरी पवन मिश्रा उपस्थित होते.

            प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. गोपालभाई सुतारिया यांनी गोकृपा अमृत शेतीतील एक पारंपारिक पद्धतीविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी गाईचे शेतीतील महत्त्व तसेच मानवी आरोग्याकरीता गायीच्या दुधाचे, दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र व शेण याचा उपयोग मानवी आरोग्य व शेतीची सांगड घालत असतांना गो-आधारित शेती म्हणजेच गाईच्या गोमूत्र व शेणापासून फायदेशीर जिवाणू घेऊन तयार केलेले गोकृपा अमृत शेतीची सुपीकता वाढविणे तसेच रोग व किडींचे नियंत्रणासाठी कसे फायदेशीर आहे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

            जिल्ह्याची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल आणि शेतकऱ्यांचा सहभाग याविषयी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध शेतकऱ्यांनी व कृषी विज्ञान केंद्र, करडा येथील उद्यानविद्या विभागाचे शास्त्रज्ञ निवृत्ती पाटील यांनी गो कृपा अमृतविषयी अनुभव कथन केले. कार्यशाळेला जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी केले 

          तसेच यावेळी आपत्ती व्यवस्थापनाबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे पहिल्या सत्रात आयोजन करण्यात आले. मानसेवा सामाजिक आपती व्यवस्थापन व संत गाडगेबाबा आपत्ती शोध व बचाव पथक, पिंजर ता. बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील जीवरक्षक दिपक सदाफळे यांनी उष्माघात, आपत्ती व्यवस्थापन, पुर, वीज व आग याविषयी माहिती देवून मार्गदर्शन केले.

          या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध गावचे सरपंच, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक तसेच पाणी फाउंडेशनच्या गटातील शेतकरी, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनमधील गटातील शेतकरी, आत्मा अंतर्गत सेंद्रिय शेती गटातील शेतकरी व वंदे गोमातरम गटाचे गोपालक शेतकरी तसेच बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला व हिंगोली  जिल्हयातील शेतकऱ्यांची देखील उपस्थिती होती.

          कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रवी अंभोरे, विनोद मारवाडी, नागोराव खोंड, सागर बदामकार, गजानन दंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश