डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना



डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

         वाशिम, दि. 12 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 7 बाबींचा समावेश आहे. यामध्ये नवीन विहीर तयार करणे यासाठी 2 लक्ष 50 हजार रुपये, जुन्या विहीरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, इनवेल बोअरिंगसाठी 20 हजार रुपये, वीज जोडणीसाठी 10 हजार रुपये, शेततळयाच्या प्लास्टीक अस्तरीकरणासाठी 1 लक्ष रुपये, सुक्ष्म सिंचन संच यामध्ये ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार रुपये, तुषार सिंचन संचासाठी 25 हजार रुपये आणि पंप संच यामध्ये डिझेल किंवा विद्यूत ज्याची क्षमता 10 अश्वशक्तीपर्यंत आहे त्यासाठी 20 हजार रुपये अशी अनुदान मर्यादा निश्चित केली आहे.

             या योजनेअंतर्गत वरील 7 बाबींचा समावेश असून लाभ हा पॅकेज स्वरुपात देण्यात येतो. ज्या अनुसूचित जाती किंवा नवबौध्द घटकातील शेतकऱ्याने यापुर्वी नवीन विहीर व जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेतला असेल अशा लाभार्थ्याव्यतिरिक्त इतर सर्व लाभार्थ्यांना पुढील 3 पैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ या शेतकऱ्याला देता येतो.

             नवीन विहीर पॅकेज देतांना त्यामध्ये नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेजमध्ये जुन्या विहीरीची दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग. जुन्या विहीर दुरुस्तीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याच्या सातबारावर विहीरीची नोंद असावी. शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण या पॅकेजमध्ये शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन व पंप संच. ज्या शेतकऱ्याने मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे पुर्ण केलेले आहे तेच शेतकरी या पॅकेजचा लाभ घेऊ शकतात.  

             ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच योजनेतून किंवा स्वखर्चाने विहीर घेतली असेल, त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संच यासाठी अनुदान देता येईल. जर शेतकऱ्याला महावितरण कंपनीकडून सोलार पंप मंजूर झाला असेल तर पंप संच व वीज जोडणीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या मर्यादेत 30 हजार रुपये लाभार्थी हिस्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करता येईल.

             वरील घटकांपैकी काही घटक शेतकऱ्याकडे असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील घटकांची निवड करावी लागेल. यामध्ये वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन, पंप संचाचा समावेश आहे. यासाठी पुर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकरी वरील बाबींची अंमलबजावणी करतील.

             लाभार्थी पात्रता - लाभार्थी हा अनुसूचित जाती किंवा नवबौध्द शेतकरी असावा. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र या योजनेचा लाभ मिळण्यासाठी असणे आवश्यक आहे. व्यक्तिक लाभार्थी निवडतांना महिला व दिव्यांग लाभार्थ्याला प्राधान्य येण्यात येईल. शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न हे 1 लक्ष 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. नवीन विहीरीचा लाभ घ्‍यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच यापुर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थ्याच्या सातबारावर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास विहीर या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून 500 फुटाच्या अंतरापर्यंत दुसरी विहीर नसावी. ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीरी व्यतिरीक्त अन्य बाबीचा लाभ घ्यावयाचा आहे, त्यासाठी किमान 0.20 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटूंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. या योजनेअंतर्गत कमाल शेतजमीनीची अट 6 हेक्टर इतकी आहे.

            आवश्यक कागदपत्रे - या योजनेअंतर्गत विविध बाबींचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्याकडे सातबारा व आठ-अ असणे आवश्यक आहे. आधारकार्ड, लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले असणे आवश्यक आहे. तहसिलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला, नवीन विहीरीच्या बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक आहे.

            ग्रामसभेने शिफारस केलेल्या इच्छुक शेतकऱ्याने https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. प्रस्तावाची मुळप्रत पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावी. नवीन विहीरीसाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे कार्यारंभ आदेश देतील. त्यानंतर 30 दिवसाच्या आत काम सुरु करावे.

            नवीन विहीर/ जुनी विहीर दुरुस्तीसाठी लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याने इनवेल बोअरिंगची मागणी केल्यास 20 हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान देय राहील. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा योग्यता अहवाल यासाठी आवश्यक आहे. शेततळे अस्तरीकरणासाठी 500 मायक्रॉन जाडीची प्लास्टिक फिल्म रिइनफोर्सड एचडीपीई जीओ मेंबरेन फिल्म वापरावी लागेल. मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत पुर्ण झालेले शेततळे असावे.

            ठिबक सिंचनसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून 35 टक्के म्हणजे 50 हजार रुपये मर्यादेत अनुदान असे एकूण 90 टक्के अनुदान लाभार्थ्याला देण्यात येईल. तुषार सिंचनसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 55 टक्के अनुदान व या योजनेतून 35 टक्के कमाल 25 हजार रुपये असे 90 टक्के अनुदान लाभार्थ्यांना देता येईल. पंप संचासाठी 10 अश्वशक्ती पर्यंतचे विद्यूत पंप घेता येईल. पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडून पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थ्याने एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करावा.

           नवीन विहीर पॅकेज किंवा जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज किंवा शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण या पॅकेजमधील तथा आवश्यकतेनुसार केवळ वीज जोडणीची मागणी करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्याने विद्यूत वितरण कंपनीकडे कोटेशन भरल्याची पावती वीज जोडणी आकारासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावी. देण्यात येणारे अनुदान इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरव्दारे (इएफटी) व्दारे लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित घटकातील लाभार्थ्यांनी तालुकास्तरावर पंचायत समितीच्या कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

 

जिल्हा माहिती कार्यालय,

       वाशिम

                                                                                                                                          *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश