मुद्रासह विविध विमा योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दयावा षण्मुगराजन एस.केंद्र सरकारच्या योजनांचा बँकर्स सभेत आढावा



मुद्रासह विविध विमा योजनांचा

जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ दयावा

                                                     षण्मुगराजन एस.

केंद्र सरकारच्या योजनांचा बँकर्स सभेत आढावा

        वाशिम, दि. 18 (जिमाका) : जास्तीत जास्त व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांची मुद्रा ही महत्वाकांक्षी योजना आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून गरजू व होतकरु व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनी मोठया प्रमाणात मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज वितरण करतांना गोरगरीबांसाठी असलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना व प्रधानमंत्री जनधन योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून दयावा. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

           17 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आकांक्षित जिल्हा म्हणून केंद्र सरकारच्या मुद्रा व विमा योजनांच्या आढावा घेतांना आयोजित सभेत श्री. षमुगराजन बोलत होते. सभेला बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. ए.बी. विजयकुमार, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक उमेश पराते, उपक्षेत्रीय व्यवस्थापक गोविंद इंगळे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

          श्री. षण्मुगराजन म्हणाले, बँकांनी लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय सुरु करता यावा. याकरीता मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. त्यामुळे जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी हातभार लागेल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेळेतच कर्ज उपलब्ध करुन दयावे. ग्रामीण व शहरी भागातील गरीब व्यक्तींना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना व प्रधानमंत्री जनधन योजनेचा मोठया प्रमाणात लाभ मिळाला पाहिजे, यासाठी बँकांनी या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी त्या लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे. म्हणजेच त्यांना पुढे या योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

          बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये जावून दयावी असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, त्यासाठी बँकांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शिबीराचे आयोजन करावे. शाखा व्यवस्थाकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील सरपंच आणि सचिवांचा व्हॉटसॲप ग्रुप बनवून वेळोवेळी त्यांना माहिती देऊन त्यांच्या संपर्कात राहावे. त्यामुळे बँकांच्या शिबीराला ग्रामपंचायतसह ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळून शिबीराचे यशस्वी आयोजन करता येईल. बँकांना विविध योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्याचे जे उदिष्ट दिले आहे ते पुर्ण करुन जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यास हातभार लावावा असे ते म्हणाले.

         श्री. विजयकुमार म्हणाले, विविध बँकांनी मुद्रा कर्जाचे जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना वितरण करावे. त्यामुळे अनेकांना स्वावलंबी करण्यास मदत होणार आहे. बँकांची मुद्रा कर्ज वाटप करण्यात महत्वाची भूमिका आहे. बँकांनी बँक प्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावे. मुद्रा कर्ज वाटप करतांना बँकांनी नकारात्मक भूमिका घेवू नये. स्टॅन्डअप इंडिया योजनंअंतर्गत बँकांना देण्यात आलेले उदिष्ट वेळेत पुर्ण करावे. जूनपर्यंत या योजनेअंतर्गत कर्ज वाटप पूर्ण करण्याचे नियोजन आतापासूनच करावे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग येाजनेअंतर्गत दिलेले उदिष्ट देखील बँकांनी पुर्ण करावे. असे त्यांनी सांगितले.

          श्री. बारापात्रे यांनी बँकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. जिल्हयात 491 ग्रामपंचायतीपैकी 138 ग्रामपंचायतीमध्ये वित्तीय समावेशनातून सशक्तीकरण शिबीरे आयोजित केल्याचे सांगितले. या शिबीरातून ग्रामस्थांना बँकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांना शिबीरातून विमा काढण्यास प्रोत्साहित केले. सन 2022-23 या वर्षात मुद्रा योजनेचे 302 कोटी रुपये कर्ज वाटपाचे उदिष्ट दिले असता बँकांनी 321 कोटी रुपये कर्ज वाटप केले. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा 1 लक्ष 17 हजार 6 लाभार्थ्यांचा विमा काढण्याचे उदिष्ट दिले असता 74 हजार 542 लाभार्थ्यांचा विमा काढण्यात आला. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा 3 लक्ष 62 हजार 727 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उदिष्ट दिले असता 2 लक्ष 4 हजार 481 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अटल पेंशन योजनेचा 34 हजार 545 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उदिष्ट दिले असता 40 हजार 677 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत 3 लक्ष 92 हजार 867 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उदिष्ट दिले असता बँकांनी 3 लक्ष 89 हजार 499 लाभार्थ्यांना लाभ दिल्याची माहिती श्री. बारापात्रे यांनी यावेळी दिली. सभेला विविध बँकांचे जिल्हा समन्वयक यावेळी उपस्थित होते.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश