शासकीय योजनांच्या जत्रेसाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे - षण्मुगराजन एस.


शासकीय योजनांच्या जत्रेसाठी यंत्रणांनी

मिशन मोडवर काम करावे

                                             - षण्मुगराजन एस.

         वाशिम, दि. 26 (जिमाका) : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत “जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची ” हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन शासकीय यंत्रणांनी मिशन मोडवर करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले.

             आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासकीय योजनांच्या जत्रेच्या अनुषंगाने विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख यांची पुर्वतयारी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेत मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे हे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होते.सभेत उपवनसंरक्षक श्री. वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांची  प्रमुख  उपस्थित होती.

             श्री. षण्मुगराजन म्हणाले, विविध  यंत्रणांना ज्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दयायचा आहे ते उद्दिष्ट निश्चित करावे. कोणत्याही कागदपत्राअभावी लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचि‍त राहणार नाही यासाठी कागदपत्रांची पुर्तता करुन घ्यावी. सुक्ष्म नियोजनातून लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करावे.

           श्री. शिंदे म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकाला योजनांचा लाभ मिळाला पाहिजे हा या जत्रेचा उद्देश आहे. सर्वांना या उपक्रमात सहभागी करुन घ्यायचे आहे. सेवाभावनेतून हे काम करायचे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दयायचा आहे. गावपातळीवरील विविध यंत्रणेला या उपक्रमात सहभागी करुन घेवून गावातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात यावे. तालुका व जिल्हास्तरावर या यात्रेबाबत समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

         श्री. देवरे म्हणाले, जिल्हयात शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी यंत्रणांच्या दोन सभा झाल्या आहेत. यंत्रणांनी त्यांच्या विभागामार्फत राबवित असलेल्या योजनांचा जिल्हयातील लाभार्थ्यांना या उपक्रमादरम्यान लाभ देण्याचे नियोजन करीत आहे. प्रत्येक यंत्रणेने आपल्या अधिनस्त योजनांचा वस्तुनिष्ठ स्वरुपात लाभ देण्याचे काम या उपक्रमातून करावे. जिल्हयातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ एकाच दिवशी देण्यात येणार आहे. थेट लाभ देणाऱ्या यंत्रणांनी आपल्या लाभार्थ्यांची संख्या जिल्हा कक्षाला कळवावी असे ते म्हणाले.

       सभेत विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होते.



Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश