सामाजिक सलोखा कायम राहून जिल्हा भेदभावमुक्त राहावा सामाजिक कार्यकर्ते पी.एस.खंदारेॲट्रॉसिटी कार्यशाळा




सामाजिक सलोखा कायम राहून जिल्हा भेदभावमुक्त राहावा

सामाजिक कार्यकर्ते पी.एस.खंदारे

ॲट्रॉसिटी कार्यशाळा

         वाशिम, दि. 11 (जिमाका) : मानवतावादाची पताका आपल्या खांदयावर घेऊन जाण्याचे काम संत नामदेवांनी केले. वर्णव्यवस्थेवर आधारीत समाज रचनेमध्ये उच्च निचता हा भेदभाव होता. आपण सारी इश्वराची लेकरे आहोत ही भावना त्यांच्यामध्ये होती. ज्यांनी समतेची भाषा वापरली, त्यांना इथल्या समाज व्यवस्थेने बहिष्कृत केले. समाज व्यवस्थेवर सर्वप्रथम गौतम बुध्दांनी प्रहार केला. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा तयार करण्यात आला आहे. हा कायदा समाजाला समतेकडे घेवून जाणारा आहे. जिल्हयात सुध्दा या कायद्याने सामाजिक सलोखा कायम राहून जिल्हा भेदभावमुक्त राहावा. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रबोधनकार पी.एस. खंदारे यांनी केले.

            10 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्या संयुक्त वतीने सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व सफाई कामगारांच्या प्रश्नांबाबत आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. खंदारे बोलत होते. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विधी अधिकारी किरण राऊत, ॲड. सावळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मोहनकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक ए. पी. इंगोले यांची उपस्थिती होती.

           श्री. खंदारे म्हणाले, लोक या कायद्याला दहशत समजतात. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांना असे वाटते की मी या कायद्याचा शस्त्र किंवा तलवार म्हणून वापर केला पाहिजे अशा स्वरुपाच्या बाबी पुढे येतात. ॲट्रॉसिटी कायदा हा समाजाला समतेकडे घेवून जाणारा आहे. समाजात भेदभाव होऊ नये व जातीच्या आधारावर कोणतीही अप्रीय घटना घडू नये यासाठी हा कायदा आहे. या कायद्याचा अनुसूचित जाती, जमातीच्या अन्याय अत्याचारग्रस्तांनी ढाल म्हणून वापर करावा. हा कायदा त्यांच्या संरक्षणासाठी आहे. या कायद्याबाबत समाजात काही गैरसमज पसरविण्यात येतात. त्याचा प्रत्येकाने बारकाईने अभ्यास केला तर हा कायदा या अत्याचारग्रस्तांना न्याय देण्यासाठी किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल. सफाई कामगारांसाठी असलेल्या लाड-पागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे. डॉ. आबेडकरांचा समाजमुलक विचार समाजात पेरण्याचे काम सामाजिक न्याय पर्वाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

           उदघाटक म्हणून डॉ. श्रीमती कुलाल म्हणाल्या, ही कार्यशाळा समाजाच्या अत्यंत उपयोगाची आहे. ॲट्रॉसिटी कायद्यामुळे अनुसूचित जाती, जमातीच्या अन्याय अत्याचारग्रस्त व्यक्तींना मदत मिळते. मनोधैर्य योजनेतून सुध्दा जास्तीत जास्त अत्याचारग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत अत्याचार झालेल्या व्यक्तींना कायद्यानुसार मदत करण्यात येते. सामाजिक न्याय पर्वाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

           ॲड. सावळे म्हणाले, समाजातील अनुसूचित, जमातीच्या दुर्बल घटकांना अन्याय अत्याचारापासून संरक्षण मिळावे हा या कायद्यामागचा उद्देश आहे. ॲट्रॉसिटी कायद्यापूर्वी काही कायदे होते. हे कायदे ॲट्रॉसिटी संदर्भात अपुरे असल्यामुळे 1989 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात ॲट्रॉसिटी कायदद्याची गरज पडू नये. परंतू दुर्दैवाने असे कायदे तयार करावे लागते. हा कायदा आल्यानंतर अनुसूचित जाती, जमातीच्या अन्याय अत्याचारग्रस्तांना न्याय मिळण्यास मदत झाली आहे. यावेळी त्यांनी या कायद्याअंतर्गत कोण तक्रार करु शकतो. तक्रार झाल्यास कोणते पोलीस अधिकारी सखोल चौकशी करतात याबाबतची माहिती दिली.

            यावेळी श्री. खडसे, श्री. वाठ यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक हरिष वानखडे यांनी केले. संचालन प्रा. गजानन हिवसे यांनी तर आभार अधिक्षीका कल्पना ईश्वरकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी तसेच शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

                                                                                                                                   *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश