महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून 1229 शेतकऱ्यांनी केली कृषी अवजारे व यंत्रांची खरेदी 8 कोटी 23 लक्ष 13 हजार रुपये मिळाले अनुदान


महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून 1229 शेतकऱ्यांनी केली कृषी अवजारे व यंत्रांची खरेदी 
 
8 कोटी 23 लक्ष 13 हजार रुपये मिळाले अनुदान

 वाशिम दि 6 (जिमाका) शेतीसाठी लागणारी विविध प्रकारचे यंत्रे व उपकरणांची खरेदी शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार करता यावी तसेच ही यंत्रे उपकरणे योग्य वेळेत आणि पारदर्शकपणे खरेदी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे.जिल्ह्यात सन 2022 - 23 या वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत  1229 शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रे उपकरणे व साहित्याची खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या साहित्याच्या अनुदानाची 8 कोटी 23 लक्ष 13 हजार  891 रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
          पूर्वी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी अवजारे व यंत्रे खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत यंत्रे व अवजारे खरेदीसाठी अर्ज मागविण्यात येत होते. त्या अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडल्यानंतर अर्जाची छाननी करून लॉटरी पद्धतीने मर्यादित शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळायचा.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कृषी अवजारे व यंत्रांपासून वंचित राहावे लागायचे. 
         महाडीबीटी पोर्टलवरून अवजारे व साहित्य खरेदी करण्याच्या कामात गतिमानता आणि पारदर्शकता आली. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचे अवजारे व यंत्रे आता खरेदी करता येत आहे. शासन मान्यता असलेली अवजारे व यंत्रे खरेदी केल्यानंतर त्याचे बिल महाडीबीपोर्टलवर अपलोड केल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित शेतकऱ्याच्या घरी किंवा शिवारात जाऊन ते साहित्य खरेदी केल्याची खात्री करतात. त्या वस्तूंचे व साहित्यांचे फोटो जिओ टॅगिंग करून अपलोड केली जातात. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी हे ऑनलाईनच पुढे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांना संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरेदी केलेल्या अवजारे व साहित्याच्या अनुदानाची रक्कम जमा करण्याची ऑनलाईन शिफारस करतात. ऑनलाइन पद्धतीने त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे.
         सन 2022-23 या वर्षात महाडिबीटी पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाने कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या 1229 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 21 बाबींचे 8 कोटी 23 लक्ष 13 हजार 891 रुपये अनुदान जमा केले आहे.
         कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत ट्रॅक्टर,पेरणी यंत्र, रोटाव्हेटर,ट्रॉली,बहुपिक मळणी यंत्र, कम्बाईन हार्वेस्टर,पलटी नांगर, फर्टीलायझर स्प्रेडर,फवारणी यंत्र, कॉटन थ्रेडर,बी.बी.एफ,पोटॅटो प्लांटर, पॉवर विडर,पॉवर टिलर,रिपर, कल्टीवेटर,टोकण यंत्र,दाल मिल, पाईप व पंप संच या बाबींच्या 382 लाभार्थ्यांचे 3 कोटी 5 लक्ष 72 हजार 136 रुपये जमा करण्यात आले आहे. 
             राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत 13 बाबींचे 381 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 3 कोटी 15 लक्ष 71 हजार 794 रुपये अनुदान,राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 9 बाबींवर 1 कोटी 69 लक्ष 50 हजार 942 रुपये अनुदानाची रक्कम 364 लाभार्थ्यांच्या,राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य योजनेअंतर्गत 34 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची 8 लक्ष 75 हजार 541 रुपये रक्कम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीत धान्य अंतर्गत 5 बाबींवर 66 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाचे 2 लक्ष 93 हजार 568 रुपये आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य योजनेअंतर्गत दोन बाबीवर दोन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 लक्ष 50 हजार रुपये असे एकूण 1229 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 8 कोटी 23 लक्ष 13 हजार 981 रुपये अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
      महाडीबीटी पोर्टलमुळे योजनांचा लाभ देतांना गतिमानता आणि पारदर्शकता आली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनांसारख्या योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश