सबळीकरण व स्वाभीमान योजना व उपयोजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
सबळीकरण व स्वाभीमान योजना व
उपयोजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा उत्साहात
वाशिम, दि. 12 (जिमाका) : शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना आणि अनुसूचित जाती उपयोजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आज 12 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम यांच्या संयुक्त वतीने आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे, पशुसंवर्धनचे जिल्हा उपायुक्त डॉ. शशीकांत कानफाडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी जी. बी. गिरी, माविमचे तालुका व्यवस्थापक संतोष मुखमाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. खांडेकर व समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविकातून हरीष वानखेडे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजना व अनुसूचित जाती उपयोजना लाभार्थ्यांच्या कार्यशाळेची रुपरेषा सांगून योजनेबाबत माहिती दिली. श्री. खांडेकर यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती दिली. तसेच महाडीबीटी या ऑनलाईन पोर्टलविषयी माहिती सांगितली. श्री. मुखमाले यांनी जिल्ह्यामध्ये महिला हया बचतगटाच्या माध्यमातून प्रगती करीत आहे. महिला बचतगटांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
श्री. गिरी यांनी फायदेशीर शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, माती नमुना तपासणी अत्यंत गरजेची असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनु. जाती, जमाती घटकांतील लाभार्थ्यांनी विहीर, शेततळे इत्यादींसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. कानफाडे यांनी तळागाळातील वंचित घटकांपर्यंत योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करण्याचे आवाहन केले. त्यासाठी गावातील आशासेविका, अंगणवाडी सेविका, तलाठी व ग्रामसेवक या गावपातळीवर कार्य करणाऱ्यांची मदत घेतली पाहिजे असे सांगितले. दुधाळ म्हशी वाटप, शेळी गट वाटप अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. आनंदा ताकतोडे या लाभार्थ्याने मनोगतातून आपल्याला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेतून मिळालेल्या शेतीमुळे प्रगती झाली असल्याचे सांगून जमीन नावावर झाल्याचा आनंद व्यक्त केला.
श्री. गव्हाळे यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेअंतर्गत अनु. जाती घटकातील भूमीहीन लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर 2 एकर बागायती किंवा 4 एकर जिरायती जमीन देण्यात येते. यावेळी त्यांनी अनुसूचित जाती उपयोजनेची सर्व तपशीलवार माहिती सांगून विविध योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभामुळे अनुसूचित जाती व जमाती घटकातील लाभार्थ्यांची प्रगती झाल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून श्री. तोटावार यांनी सामाजिक न्याय पर्वानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करुन गावपातळीवर सर्व योजनांचे चिंतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरुणांनी रोजगारांसाठी गट स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच कृषी विभागामार्फत 135 योजना राबविण्यात येत असल्याचे श्री. तोटावार यांनी सांगितले.
सुत्रसंचालन प्रा. गजानन हिवसे यांनी केले तर आभार समतादूत प्रणिता दसरे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी, योजनेचे लाभार्थी व नागरीक, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी तसेच शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment