महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी रॅलीतून महात्मा फुलेंच्या पुतळयाला अभिवादन व्याख्यानातून महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर प्रकाश विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
- Get link
- X
- Other Apps
महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
रॅलीतून महात्मा फुलेंच्या पुतळयाला अभिवादन
व्याख्यानातून महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर प्रकाश
विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
वाशिम, दि. 11 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती), नागपूर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. आणि जिल्हा जात पडताळणी समिती यांच्या संयुक्त वतीने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला हिरवी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच इतर मान्यवर या रॅलीत सहभागी होते. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरु करण्यात आली. रॅली नंदीपेठ येथे पोहोचून समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री. वाठ यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनपटावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करुन महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त आंबेडकरी विचारवंत गोपाळराव आटोटे गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चंद्रभान पौळकर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. दिपक उलेमाले, प्रा. रवि बावीसकर, ॲड. श्रीमती डी. के. सांबार, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य यु. एस. जमदाडे, पोलिस निरीक्षक श्री. राठोड व समाज कल्याणचे सहाय्य्क आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.
प्रस्ताविकातून श्री. वाठ यांनी सामाजिक न्याय पर्वाचा हा आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती आज आपण साजरी करीत आहोत. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. पौळकर म्हणाले, तळागळातील लोकांसाठी महात्मा फुले आयुष्यभर झटत राहिले. श्री. बावीसकर बोलतांना म्हणाले, क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी दाखविलेल्या शिक्षणाच्या मार्गामुळेच मानवाचा विकास होत आहे. महात्मा फुले यांनी गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्री शिक्षणाच्या उध्दाराचे कार्य केले. समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचले पाहिजे. अज्ञानाचा विलोप करण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी व स्त्रीयांसाठी शाळा काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पगडा महात्मा फुले यांच्या जीवनावर होता असे सांगितले.
डॉ. उलेमाले म्हणाले, आज सरकारने शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा. त्यामुळे समाजाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होईल. शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकातून शेतकऱ्यांचे शोषण कसे होते आणि ते कसे थांबविले पाहिजे याबाबत सविस्तर विवेचन केले.
ॲड. श्रीमती सांबार म्हणाल्या, महात्मा फुले यांनी जगात माणुसकी हा एकच धर्म आहे व माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे माणुसकी आहे. शोषणाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी महात्मा फुले यांनी शेतकरी व न्हावींचा संप पुकारला होता म्हणून त्यांना समाजसुधारक नव्हे तर समाजक्रांतीकारक म्हटले पाहिजे असे सांगितले. रुपाली वानखेडे या विद्यार्थीनीने आपल्या मनोगतातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याची माहिती देवून ते स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त श्री. आटोटे गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणास्त्रोत महात्मा फुले होते. नवसमाज निर्मितीमध्ये महात्मा फुले यांचे योगदान खूप मोठे आहे. अज्ञानाचे मूळ कारण अविद्या आहे. म्हणून शिक्षण हे सार्वत्रिक झाले पाहिजे यावर महात्मा फुले यांनी भर दिल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन हिवसे यांनी केले. आभार हरीष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी, नागरीक, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी, शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment