सामाजिक न्याय पर्वानिमित्तज् येष्ठ नागरीक व दिव्यांग सामाजिक सुरक्षितता योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय पर्वानिमित्त
ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग सामाजिक सुरक्षितता योजनेबाबत कार्यशाळा उत्साहात
वाशिम,दि.२५ (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,वाशिम येथे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,वाशिम, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प. वाशिम,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,वाशिम आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने शासकीय योजनांची जत्रा व सामाजिक न्याय पर्वाअंतर्गत ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग यांना सामाजिक सुरक्षितता योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन आज सामाजिक न्याय भवनातील सभागृहात करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.ए.टेकवाणी होते.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी राऊत,जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे,ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष पी.डी. जाधव,डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिवमंगलअप्पा राऊत, व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वनमाला पेंढारकर, मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके,सहाय्यक लोक अभिरक्षक श्री.पंचवटकर,ऍड. वर्षा रामटेके, उपमुख्य लोक अभिरक्षक ऍड. शुभांगी खडसे,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक एस.एन.भुरे, उपस्थित होते.
प्रस्ताविकातून समाज कल्याण कार्यालयाच्या अधिक्षिका कल्पना ईश्वरकर यांनी ज्येष्ठ नागरीक व दिव्यांगांसाठी समाज कल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देवून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
यावेळी आर.सी.मस्के यांनी लिहिलेल्या ज्येष्ठांचे ज्येष्ठत्व या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
श्री.शेळके यांनी २२ एप्रिल या वसुंधरा दिवसानिमित्त मार्गदर्शन केले. प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
ऍड.शुभांगी खडसे यांनी आपल्या मनोगतामध्ये दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षिततेच अधिकार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. दिव्यांगांसाठी असलेल्या २०१६ च्या कायद्याबाबत विस्तृत माहिती दिली. त्यामध्ये दिव्यांगांची व्याख्या सांगून त्यांची श्रेणी ही ७ वरुन २१ अशी केल्याचे सांगितले. तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध अधिकार,आरक्षण व विशेष न्यायालयाबाबत माहिती दिली.दिव्यांगांसोबत भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर दंडाचे प्रावधान कायद्यामध्ये असल्याचे सांगितले.
ऍड श्री.पंचवटकर यांनी जेष्ठ नागरीकांच्या सामाजिक सुरक्षिततेचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरीकांसाठी २००७ च्या कायद्यामध्ये विविध अधिकार दिले आहे.त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी सदर कायद्यामध्ये तरतूदी आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांच्या अधिकाराची पायमल्ली केल्यास कायदेशीर दंडाचे प्रावधान असल्याचे सांगितले.ज्यांना कायदेशीर मदत लागली तर त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जनसेवा फाऊंडेशन श्रेत्रीय प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर टेकाडे यांनी ज्येष्ठासाठी हेल्पलाईन १४५६७ याबाबत मार्गदर्शन केले.त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरीकांसाठी भावनिक आधार, न्यायीक मदत,समुपदेशन अशा विविध प्रकारे त्यांना मदत होत असल्याचे सांगितले.आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरीकांना या हेल्पलाईनबाबत माहिती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ऍड वर्षा रामटेके, उपमुख्य लोक अभिरक्षक वकील यांनी मुलांचा मोफत शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षणाचा हक्क २००९ या कायद्याबाबत मार्गदर्शन केले.यामध्ये बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार असल्याचे सांगितले. कोणत्याही बालकाला हा हक्क मिळत नसल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री.सोनवणे यांनी समाजात समता आणण्याचे काम महापुरुषांनी केल्याचे सांगितले.वंचित व पीडीतांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराबाबत जाणीव नसल्याने कायद्याची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व कायदे व योजनांचा प्रचार प्रसार व्हावा हा या कार्यशाळेचा उद्देश असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यशाळेची माहिती उपस्थितांनी समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव श्री.टेकवाणी यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना सर्व कायदे व योजनांचे लाभ मिळाले पाहिजे. या सामाजिक सुरक्षेच्या जाणीवेमुळेच संविधानात दिव्यांग व जेष्ठ नागरीकांसाठी विविध तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमामध्ये दिव्यांग - अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेंतर्गत लाभार्थींना बचत प्रमाणपत्र व धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,दिव्यांग लाभार्थी व्यक्तींना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाचे कॅलेंडर व माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.लता कोरडे यांनी माविममार्फत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती देवून स्पार्क उपक्रमाबाबत सांगितले. त्याअंतर्गत दिव्यांगांना बचतगटामध्ये समावेश करणे, गावातील दिव्यांगांची नोंद घेणे,विविध योजनांची माहिती त्यांना देणे याबाबतची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. कव्हर यांनी केले.आभार संध्या देखणे यांनी मानले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील दिव्यांग,ज्येष्ठ नागरीक, समाजभुषण पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी,समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग,सर्व ब्रिक्स प्रा.लि.व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment