जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा


जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा

     वाशिम, दि. 01 (जिमाका) : हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती आज 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्यात आली. कृषी दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मॉ जिजाऊ सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २५ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहीमेचा यावेळी समारोप करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्‍या शुभहस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन पूजन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या  अध्‍यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत होत्या. यावेळी प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, वाशिम पंचायत समिती सभापती रेश्‍मा गायकवाड, पंचायत समिती सदस्य बळीराम माहोरे व नारायण खोडके, सेंद्रिय शेती कृषीभुषण पुरस्‍कार विजेते राधेश्‍यामजी मंत्री व तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. 

          कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी कृषी दिन साजरा करण्याचे महत्त्व तसेच कृषी संजीवनी मोहिमेचा संक्षिप्त माहिती दिली. विशेष मार्गदर्शक म्‍हणुन पुणे येथील नॅशनल केमिकल या विषयात डॉक्टरेट प्राप्‍त डॉ. संतोष चव्‍हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जैविक प्रयोगशाळा याबाबत विस्तृत मार्गदर्शन करुन सेंद्रिय शेतीचे महत्व विशद केले. शेतकऱ्यांच्‍या बांधावरती जैविक प्रयोगशाळा आता कशी काळाची गरज आहे हे त्‍यांनी त्‍यांच्‍या जर्मनी व स्‍पेनमधील तांत्रिक अनुभवावरुन यावेळी उपस्थितांना सांगुन जैविक शेतीकडे वळण्‍याचे आवाहन केले.

         अध्यक्षीय मार्गदर्शनातून श्रीमती पंत यांनी कृषी विभागामार्फत पार पाडण्यात येत असलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करून कृषी विभागाच्‍या कार्याचा गौरव केला.

         या कार्यक्रमास उपस्थित असलेले कृषि आयुक्तालय, पुणे कार्यालयाचे तंत्र अधिकारी राहुल माने यांनी सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास या नवीन राज्य योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. २५ जूनपासून सुरू असलेली कृषी संजीवनी मोहिम जिल्ह्यातील जवळपास ६५० गावांमध्ये विविध विषयांचे मार्गदर्शन करून साजरी करण्यात आली. या मोहीमेचा लाभ जिल्‍हयातील बहुसंख्‍य शेतकऱ्यांनी घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

          जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी, श्री. गिरी यांनी कृषी दिनाचे महत्त्व विषद करतांना हरित क्रांतीची गरज व त्‍यामुळे साध्‍य झालेली अन्‍न्‍ाधान्‍य स्‍वयंपुर्णता याबाबत माहिती दिली. कार्यक्रमास उपस्थित सेंद्रिय शेती कृषीभूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. राधेश्यामजी मंत्री यांनी उपस्थितांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी महाविद्यालय, आमखेडा येथील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शुभम वाकुडकर व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून प्रियंका पाटील यांनी उपस्थितांना कृषी दिनाचे महत्त्व विशद केले. कृषी दिनामध्ये विविध विषयाचे सादरीकरणासाठी जिल्हा तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन कृषी विभागातील डॉ. हुसेन यांनी केले. आभार तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाशिमचे कृषी पर्यवेक्षक नितीन उलेमाले यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे