वीजेच्या बाबतीत जिल्हयाचे मागासलेपण दूर होण्यास मदत चंद्रकांत ठाकरे

 
वीजेच्या बाबतीत जिल्हयाचे मागासलेपण

दूर होण्यास मदत

                                                      चंद्रकांत ठाकरे

“ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” अंतर्गत उर्जा महोत्सव

·        योजनेचे लाभार्थी सन्मानीत

·        8 वर्षातील उर्जा कामगिरीवर ध्वनीचित्रफितीतून उजाळा

·        विद्यार्थ्यांच्या पथनाटयातून प्रबोधनाचा संदेश

      वाशिम, दि. 26 (जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकारने उर्जा विभागाच्या माध्यमातून 8 वर्षात केलेल्या प्रगतीची माहिती “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” या महोत्सवातून मांडण्यात येत आहे. कोळसा साठा भविष्यात संपणार असल्याने औष्णिक वीज निर्मितीला मर्यादा येणार आहे. अपारंपारीक उर्जेतून देश सन 2047 पर्यंत समृध्द होईल. सौर, पवन आणि जल उर्जेतून आपण वीजेच्या बाबतीत संपन्न होणार आहोत. या पारंपारीक उर्जेतूनच आपल्या आकांक्षित जिल्हयाचे मागासलेपण दूर होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.

        आज 26 जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” च्या निमित्ताने आयोजित उर्जा महोत्सव - पॉवर 2047 या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री. ठाकरे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, महावितरण अकोलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, नागपूरचे अधिक्षक अभियंता हरीष गजभिये, महावितरण अकोला येथील पायाभूत सुविधाचे अधिक्षक अभियंता अनिल वाकोडे, केंद्र सरकारच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे मंडळ अधिकारी पी.एस. मिश्रा आणि कार्यकारी अभियंता रत्नदिप तायडे यांची उपस्थिती होती.

        श्री. ठाकरे पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयाच्या इमारतीच्या छताचा वापर सौर उर्जा निर्मिती करण्यासाठी करण्यात यावा. ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवरुन सौर उर्जेची निर्मिती व्हावी. जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची जोडणी देण्यात यावी. 8 वर्षात उर्जा विभागाने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

        जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन म्हणाले, आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून उर्जा क्षेत्रातील 8 वर्षाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” हा महोत्सव- पॉवर 2048 च्या माध्यमातून करण्यात येत आहे. देशातील उर्जेची उत्पादन क्षमता वाढली आहे. मागणीपेक्षा ती 1 लाख 85 हजार मेगावॅट अधिक आहे. शेजारच्या देशांना आता भारतातून वीज निर्यात होत आहे. सन 2030 पर्यंत उर्जा उत्पादन क्षमतेपैकी 40 टक्के नवीकरणीय उर्जा स्त्रोतांकडून वीज उपलब्ध होईल. देशात आज नवीकरणीय उर्जा स्त्रोतांव्दारे 1 लाख 63 हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

        श्री. रंगारी म्हणाले, उर्जा योजनेच्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या विविध योजना महावितरण राबविते. दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्हयातील ग्रामीण भागातील वीज प्रणाली सुधारणा करण्यासाठी 87 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. या निधीतून आसेगांव, कुपटा व बेलमंडळ येथे 33 के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वीत झाले. पोहरादेवी व दापूरा येथील उपकेंद्रातील रोहित्र क्षमतेत वाढ झाली. जिल्हयातील 5 हजार 601 दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना नवीन विद्यूत जोडणी देण्यात आली. सौभाग्य योजनेअंतर्गत 1726 वीज ग्राहकांना नवीन विद्यूत जोडणी, अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 892 कृषी पंप ग्राहकांना सौर कृषी पंप जोडणी आणि 5964 कृषी पंप ग्राहकांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौर कृषी पंप स्थापीत केल्याचे त्यांनी सांगितले.

        यावेळी उर्जा विभागाच्या कृषी पंपाला वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफार्मर बसविलेले लाभार्थी कुंडलीक चोपडे, अनसिंग येथील गोविंदप्रसाद सोनी यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ आणि सौभाग्य योजनेतून वीज मीटर मिळालेले लाभार्थी गजानन वल्ले यांनी योजनेच्या लाभाबाबत मनोगत व्यक्त केले. या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

        “ उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य ” या महोत्सवाअंतर्गत केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालय आणि नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाने 8 वर्षात उर्जा क्षेत्रात सौभाग्य योजना, ग्रामीण विद्युतीकरण, लघु विद्युतीकरण व बळकटीकरण, अधिक उर्जा व नविकरणीय उर्जा यासह अन्य योजनांची माहिती देणाऱ्या आणि यश मांडणाऱ्या ध्वनी चित्रफीती सभागृहात उपस्थितांना यावेळी दाखविण्यात आल्या.

        महावितरणचे वाशिम येथील अधिकारी गणेश चव्हाण आणि मोहन वाघमारे यांनी ‘ हम हिंदुस्थानी ’ हे गीत सादर केले. बालकीवाल विद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक श्री. काळे यांच्या मार्गदर्शनात विजेचे महत्व सांगणारे पथनाटय सादर करुन उपस्थितांची प्रशंसा मिळविली. बंजारा भगिनींनी पारंपारीक वेशभुषेत लेंगी नृत्य सादर केले.

        कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र देशमुख, विनोद पट्टेबहादूर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, राजेश सोनखासकर, पॉवर फायनान्स को-ऑपरेशनचे प्रकल्प समन्वयक प्रदीप वर्मा यांचेसह महावितरणचे अधिकारी-व कर्मचारी, इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी, उर्जा विभागाच्या योजनांचे लाभार्थी व नागरीक यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॉवर फायनान्स को-ऑपरेशनचे मंडळ अधिकारी पी.एस. मिश्रा यांनी केले. संचालन सहायक अभियंता पंकज माळी यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी मानले.     

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे