13 ते 15 ऑगस्ट दरम्यानच्या‘ हर घर तिरंगा ’ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे

13 ते 15 ऑगस्ट दरम्यानच्या
‘ हर घर तिरंगा ’ उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे
                                                               जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
      
वाशिम, दि.18 (जिमाका)  देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण होत आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती नागरीकांच्या मनात तेवत राहाव्यात तसेच स्वातंत्र्य लढयातील अज्ञात नायक/ क्रांतीकारक व घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होवून देशभक्तीची भावना जनमाणसात कायमस्वरुपी राहावी याच उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ हा उपक्रम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर,शासकीय व निमशासकीय तसेच विविध खाजगी आस्थापनांवर तिरंगा ध्वज लावण्याच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी केले.
        आज 18 जुलै रोजी ‘ हर घर तिरंगा ’ उपक्रम राबविण्याबाबत आयोजित सभेत श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,उपवनसंरक्षक श्री. मिणा, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संजय जोल्हे, नगर पालिका प्रशासन अधिकारी दिपक मोरे, महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, जिल्हा जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता श्री. वानखेडे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता,राष्ट्रीय महामार्ग तसेच समृध्दी महामार्गाचे कार्यकारी अभियंता यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
        श्री.षण्मुगराजन म्हणाले, ‘ हर घर तिरंगा ’ या उपक्रमासाठी जिल्हयाला 3 लक्षपेक्षा जास्त तिरंगा ध्वजाची आवश्यकता आहे.प्रत्येक विभागाने काही तिरंगा ध्वज खरेदी करण्याचे नियोजन करुन 30 जुलैपर्यंत ध्वज उपलब्ध करुन घ्यावे. पूर्वी हा उपक्रम 11 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान राबवायचा होता. आता हा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवायचा आहे.या उपक्रमासाठी नागरीकांनी स्वईच्छेने ध्वज खरेदी करावा.जे ध्वज खरेदी करु शकणार नाही त्यांना तिरंगा ध्वज भेट म्हणून दयावा.विविध विभागाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांना ध्वज खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी देखील स्वईच्छेने वर्गणी गोळा करुन ध्वज खरेदी करावे.असे त्यांनी यावेळी सांगितले.
        सिंचन, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम,राष्ट्रीय महामार्ग,समृध्दी हायवे, नगर पालिका प्रशासन यासह अन्य मोठया विभागांनी 1 लक्ष ध्वज खरेदी करावे असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले,मोठया विभागांनी प्रत्येकी 10 हजार ध्वज खरेदी करावे.विभागांनी ध्वज विक्रीचे स्टॉल लावून तिरंगा ध्वजाची विक्री करावी.1 लक्ष राष्ट्रध्वज केंद्र सरकारकडून उपलब्ध होण्याची शक्यता आहे.पाणी पुरवठा,कृषी विभाग,बँका व त्यांचे मोठे खातेदार, बँकांनी त्यांच्या सीएसआर निधीतून, सेवाभावी संस्था, व्यापारी संघटना, केमीस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोशिएशन, आयएमए संघटना आणि लॉयन्स क्लब यांनी या उपक्रमासाठी लागणाऱ्या तिरंगा ध्वजासाठी निधी उपलब्ध करावा.नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील दुकानदारांची सभा घेवून ध्वज खरेदी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. असे सांगितले.
        श्री. हिंगे यांनी उपक्रमाबाबतची माहिती दिली. हा उपक्रम 11 ते 17 ऑगस्ट ऐवजी आता 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे.विविध विभागांनी, सेवाभावी संस्था,विविध संघटनांनी ध्वज खरेदी करण्यासाठी स्वईच्छेने निधी गोळा करावा.विविध कार्यालयाबाहेर तिरंगा ध्वज विक्रीचे स्टॉल लावून ध्वजाची विक्री करावी. असे सांगितले.
             या सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व मुख्याधिकारी व सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.        
                    *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे