राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान स्वयंरोजगारांसाठी 12 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत नोंदणी



राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान

स्वयंरोजगारांसाठी 12 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत नोंदणी

       वाशिम, दि. 14 (जिमाका) : दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाअंतर्गत स्वयंरोजगार या घटकांसाठी नगर परिषद, वाशिम अंतर्गत सन २०२२-२३ चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील पात्र व निवडक वैयक्तीक लाभार्थ्यांचे कर्जप्रकरण, गट व बचत गटांचे कर्जप्रकरण बँकांना पाठविण्याकरीता पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी 12 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत नगर परिषद वाशिम येथील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या कक्षात विशेष नोंदणी अभियानात आपले अर्ज सादर करावे.

        दारिद्रय रेषेखालील असलेल्या व १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळू शकेल. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, स्त्रिया, अल्पसंख्यांक, दिव्यांग, घर कामगार, चिंदी वेचणारे, फेरीवाले, रस्त्यावरील विक्रेते, बांधकामगार, सफाई कामगार, गृहउद्योग कामगार व वाहतूक कामगार इत्यादी पात्र व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. नगर परिषद कार्यालयातील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या कक्षात मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मदत केंद्रावर योजनेची माहिती व योजनेचे अर्ज 12 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत उपलब्ध असणार आहे. या कक्षात नगरपरिषद कार्यालयातील शहर अभियान व्यवस्थापक धम्मपाल पंडीत व धनंजय देशमुख, समुदाय संघटक श्रीमती संगिता कदम व सिंधु पवार यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून नाव नोंदणी करून अर्ज सादर करावे.

        या योजनेसाठी उमेदवारांची निवड टास्क फोर्स समितीव्दारे मुलाखत घेऊन कागदपत्राच्या आधारे केल्या जाईल. या कर्ज प्रकरणात मंजुर लाभार्थाना बँकेच्या एकुण व्याजदरापैकी ७ टक्के व्याजाची रक्कम स्वतः भरावी लागेल. ७ टक्क्यावरील व्याजदराची रक्कम राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान कक्ष दर तीन महिन्याला लाभार्थांच्या बँक खात्यात जमा करेल. घेतलेले सर्व कर्ज लाभार्थाना स्वतः परतफेड करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांचे दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, दोन पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, रहिवासी दाखला, दिव्यांग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, व्यवसाय नोंदणीचे प्रमाणपत्र, कोटेशन, नाहरकत प्रमाणपत्र, करपावती/ भाडेपावती व संबंधित व्यवसायाचे कौशल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह दोन प्रतीत अर्ज सादर करावे. तरी दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वाशिम नगर परीषदेचे मुख्याधिकारी दिपक मोरे यांनी केले आहे.

                                                                                                                                         *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे