पिकांवर शक्‍यतोवर तणनाशकाचा वापर करु नका कृषी विभागाचे आवाहन



पिकांवर शक्‍यतोवर तणनाशकाचा वापर करु नका

कृषी विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 04 (जिमाका) : जिल्‍हयात खरीपाचे एकुण क्षेत्राचे ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन हे पीक घेण्यात येते.बऱ्याच ठिकाणी शेतकरी आवश्‍यकता नसतांना पेरणीनंतर लगेच २४ ते ४८ तासात उगवणपूर्व तणनाशक फवारणी करतात. काही शेतकरी उगवणीनंतर फवारणी करण्‍याकरीता तणनाशकाचा वापर करतात. तणनाशक फवारणी करतांना अत्‍यंत काळजी घेणे आवश्‍यक असते. थोडी जरी चूक झाली तर पिकास नुकसान होते. यामध्‍ये फवारणीकरीता वापरण्‍यात येणारा पंप, प्रति एकर २०० लीटर पाणी, शुध्‍द पाण्‍याचा वापर, फ्लोटेड नोजल इत्यादी घटकाचा काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक असते. अन्‍यथा तणनाशकाचा परिणाम जाणवत नाही उलट पिकांचे नुकसान होते.

         तणनाशक फवारणी करण्‍याएैवजी आंतर मशागत जसे कोळपणी, निंदणी करुन तणाचा बंदोबस्‍त करावा. तणनाशकाचा वापर हा शेवटचा पर्याय म्‍हणुन करावा. शक्‍यतोवर सोयाबीन सारखे पिकाचे सुरुवातीचे एक ते दिड महीना तणापासून संरक्षण करणे आवश्‍यक आहे आणी ते आंतरमशागत करुन सहज शक्‍य होते.

तणनाशक फवारणी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्‍यावी -

         तणनाशक फवारणीकरीता स्‍वतंत्र पंप वापरावा, किटकनाशकाच्‍या फवारणीसाठी वापरण्‍यात आलेला पंप तणनाशकाच्‍या फवारणीसाठी वापरु नये. जमीनीत पुरेसा ओलावा असतांनाच तणनाशकाची फवारणी करावी. फवारणी करीता साधा पंप तसेच फ्लटफॅन, टी जेट किंवा फ्लडजेट नोझलच वापरावा. शिफारशीनुसार ५०० लिटर पाणी अधिक लागणारे औषध एक हेक्‍टर क्षेत्रावर फवारणी करीता वापरावे. तणनाशक फवारणी करतांना शुध्‍द व नितळ पाण्‍याचा वापर करावा, गढुळ पाणी अजिबात वापरु नये. तणनाशके हे अल्‍कधर्मी असल्‍यामुळे वापरण्‍यात येणारे पाणी आम्‍लधर्मी (पाण्‍याचा सामु ३ ते ६) असावे. तणनाशकाची क्रियाशिलता वापरण्‍यात येणाऱ्या पाण्‍याच्‍या सामुवर अवलंबून आहे. पाण्‍याचा सामु जेवढा जास्‍त तेवढी तणनाशकाची क्रियाशिलता कमी होते. व त्‍याचा प्रभाव जास्‍त कालावधीसाठी राहत नाही त्‍यामुळे पुन्‍हा तणाची वाढ होते. वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी, कारण यावेळी पानावरील छिद्रे (स्‍टोमॅटा / पर्णरंध्रे) जास्‍त प्रमाणात उघडलेली असतात. त्‍याद्वारे फवारणीचे द्रावण जास्‍त प्रमाणात तणाकडून शोषले जाते. फवारणी करणारा व्‍यक्‍ती निर्व्‍यसनी असावा. (विषबाधा टाळण्‍यासाठी फवारणी करणाऱ्या व्‍यक्‍तीने फवारणीच्‍या दिवशी व अगोदरच्‍या दिवशी मद्यपान, धुम्रपान करु नये) फवारणी करणाऱ्या व्‍यक्‍तीने सुरक्षा कवच (सेप्‍टी किट) वापरुनच फवारणी करावी. तणनाशक फवारणी केलेल्‍या शेतात फवारणीनंतर ८ ते १० दिवस डवरणी किंवा निंदनीचे काम करु नये. असे आवाहन जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना कृषी विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

                                                                                                                           *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे