ग्रामीण व शहरी भागात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी षण्मुगराजन एस.‘कॅच द रेन’ मोहिमेच्या कामाचा आढावा



ग्रामीण व शहरी भागात जलसंधारणाची

कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी

                                                    षण्मुगराजन एस.

‘कॅच द रेन’ मोहिमेच्या कामाचा आढावा

     वाशिम, दि. 04 (जिमाका) : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमीनीत जिरविणे काळाची गरज आहे. ग्रामीण आणि शहरी भागात या पावसाळयात वृक्ष लागवडीची कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डयांची तसेच बोअरवेल दुरुस्तीच्या कामातून जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

         आज 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलशक्ती अभियानाअंतर्गत कॅच द रेन मोहिमेचा आढावा आयोजित सभा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. कडू, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. वानखेडे, सहायक वनसंरक्षक श्री. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

         श्री. षण्मुगराजन म्हणाले, काही गावाजवळ असलेल्या तलावातील गाळ ग्रामस्थांच्या सहभागातून काढून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. प्रत्येक पंचायत समितीने ग्रामपंचायत अंतर्गत 50 हजार ते 1 लक्ष वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. खाजगी इमारतीला बांधकामाची परवानगी देतांना रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम करणे बंधनकारक करावे. विहीर पुनर्भरणाची कामे तसेच नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्तीची कामे मोठया प्रमाणात करण्यात यावी. रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे कमीत कमी खर्चात करण्यात यावी. प्रत्येक ग्रामसेवकाला खाजगी इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या दोन कामाचे उद्दिष्ट देण्यात यावे. ज्या गावामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची घरे आहेत त्यांच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात यावी. असे त्यांनी सांगितले.

         सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे देखील ग्रामीण भागात मोठया प्रमाणात हाती घ्यावी. असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, वृक्ष लागवडीचे नियोजन करतांना खड्डे तयार करण्याची पुर्वतयारी करण्यात यावी. जलसंधारणाची ही सर्व कामे सप्टेंबर 2022 पूर्वी पुर्ण करण्यात यावी. जी कामे झाली आहे ती सर्व कामे संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावी. ज्या विभागांनी अद्यापही कॅच द रेन मोहिमेअंतर्गत आराखडा सादर केलेला नाही त्यांनी आराखडा तात्काळ सादर करावा. असे ते यावेळी म्हणाले.

        श्रीमती पंत म्हणाल्या, मनरेगा योजनेतून प्रत्येक गावामध्ये 10 शोषखड्डयांची कामे करण्यात यावी. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वृक्ष लागवडीचे पूर्व नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       जलसंधारणाची विविध विभागाची 4322 कामे पुर्ण झाल्याची माहिती श्री. आकोसकर यांनी दिली. कृषी विभाग, नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, मृद व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि पंचायत समितीअंतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारण कामांची आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या सभेला सर्व नगर पालीका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंते उपस्थित होते.    

                                                                           

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे