मानव विकास मिशनच्या आयुक्तांनी घेतला आढावा


मानव विकास मिशनच्या

आयुक्तांनी घेतला आढावा

       वाशिम, दि. 04 (जिमाका) : मानव विकास मिशनचे आयुक्त नितीन पाटील यांनी आज 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात मानव विकास मिशनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा संबंधित यंत्रणांकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. प्रामुख्याने उपस्थित होते. श्री. पाटील यांनी मानव विकास मिशनच्या योजनांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.

          श्री. पाटील यावेळी म्हणाले, ग्रामीण भागातील दुसऱ्या गावी शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा येणार नाही यासाठी ज्या गावाला शिक्षण घेण्यासाठी मुलींना जावे लागते त्यासाठी जास्तीत जास्त मुलींना सायकल योजनांचा लाभ देण्यात यावा. यादृष्टीने जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावे. जिल्हयातील रस्ते असलेल्या दुर्गम भागात मानव विकास मिशनच्या बसेस पोहचून मुलींना शाळा असलेल्या गावी येण्या-जाण्याची सुविधा निर्माण होतील याकडे विशेष लक्ष दयावे. फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळेचा लाभ हे फिरते वाहन एकाच ठिकाणी उभे ठेवून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना दयावा. कोणत्या पिकासाठी आपली जमीन चांगली आहे. तसेच जमीनीमध्ये कोणत्या बाबीची कमतरता आहे. याची माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच शेतकरी गटाला सुध्दा एका ठिकाणी ही माती परीक्षण प्रयेागशाळा उपलब्ध करुन देण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले.

          सायन्स सेंटर लॅब चालविणाऱ्या शाळेला सुध्दा मदत करण्यात येईल. असे सांगून श्री. पाटील म्हणाले, शेतीच्या बांधावरच्या प्रयोगशाळेमुळे शाळेतील मुलांनासुध्दा विज्ञानासोबत शेती विषयक प्रशिक्षण मिळून माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जिल्हयातील ज्या भागात स्थलांतरणाचे प्रमाण जास्त आहे. अशा भागात मानव विकास मिशन निश्चितपणे काम करेल. मजूरी करणाऱ्या बाळंत महिलांना बुडीत मजूरी योजनेचा निश्चितपणे लाभ देण्यात येईल. स्तनदा माता, गर्भवती महिला, कुपोषित असलेले सॅम व मॅम बालकांवर मानव विकास मिशनचे विशेष लक्ष असून त्यांना पोषण आहार देण्याचे नियोजन करण्यात यावे. बँक सखी, बाल सखी, आरोग्य सखी, पशू सखीच्या माध्यमातून महिलांच्या विकासाला चालना देण्यात येईल. तसेच शेळीपालन, मत्स्य शेती आणि कुक्कुटपालनातून महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यावर आपला भर असल्याचे श्री. पाटील यावेळी म्हणाले. या आढावा सभेला सर्व तालुका कृषी अधिकारी देखील उपस्थित होते.  

                                                                                                                         *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे