स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
९ ऑगस्ट ते १७ ऑगस्टपर्यंत स्वराज्य महोत्सव
वाशिम, दि. 14 (जिमाका) : देशाला स्वातंत्र्य मिळण्यास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत सुरू राहणाऱ्या या उपक्रमांतर्गत या अनुषंगाने ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर स्वराज्य महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वराज्य महोत्सवांतर्गत ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन होईल. यामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच नागरीकही या वेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनासाठी सहभागी होतील.
जिल्ह्यात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आयोजन करण्यात येणार आहे. स्वराज्य महोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिका/जिल्हा परिषद व नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभांचे आयोजन करण्यात येईल. स्वातंत्र्यदिनी जिल्हास्तरावरून मुख्यालयाच्या ठिकाणी तिरंगा रंगाचे बलुन आकाशात सोडण्यात येतील. जिल्ह्यातील अनाम वीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्याच्या कडेला लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील स्वातंत्र्यकालीन माहिती अथवा ऐतिहासिक ठिकाणाची माहिती तयार करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरीचे आयोजन करुन या प्रभातफेरीत सर्वांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्याच्या मुख्यालय ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी संचलन करतील. तसेच सायक्लोथॉन, मॅरेथॉनचे जिल्ह्याच्या मुख्यालयी आयोजन करण्यात येईल. शालेय/महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धासह विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या दरम्यान स्वराज्य महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरीक आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील अनाम वीर, हुतात्मा, शहीद यांची माहिती सचित्र अनसंग हीरो बुकलेट तयार करण्यात येणार आहे. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील शासकीय इमारतीवर आझादी का अमृत महोत्सवी लोगो लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसा स्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. याच दरम्यान स्वराज्य महोत्सवानिमित्त कार्यालये स्वच्छ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसा स्थळांची देखभाल करण्यासाठी ऐतिहासिक वारसा जपणूक करणाऱ्या संस्थांना दत्तक देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयी शासनमान्य लामणदिवा लावण्यात येणार आहे. अशाचप्रकारचे उपक्रम तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात येणार आहे.
*******
Comments
Post a Comment