जिल्हयात पिकांची पेरणी पुर्ण पुढील 15 दिवसात फवारणीचे नियोजन करा



जिल्हयात पिकांची पेरणी पुर्ण

पुढील 15 दिवसात फवारणीचे नियोजन करा

कृषी विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. ०(जिमाका) : जिल्हयात खरीप हंगामातील सर्व पिकांची पेरणी पुर्ण झाली आहे. त्यामुळे आता पुढील 15 दिवसाचे नियोजन करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे. शेतातील पिकामध्ये खाडे पडले असतील तर लगेच ते भरुन घ्यावे. ज्या शेतामध्ये पीक उगवल्यानंतर पिकांची दाटी वाढली असेल तर अशा ठिकाणी विरळणी करुन झाडांची संख्या मर्यादित करावी. सुरुवातीला 15 ते 40 दिवस पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने पीक तणमुक्त ठेवणे आवश्यक आहे. गरजेनुसार पहिली डवरणी (कोळपणी) करावी. त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करुन तणांचे नियंत्रण करावे. खुरपणी/कोळपणी केल्यास जमीन भुसभुसीत होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे पिकाचे मुळ कार्यरत होऊन पिकाच्या जोमदार वाढीस मदत होते. कोळपणी करणे शक्य नसल्यास तण नियंत्रणाकरीता शिफारसीत उगवणीनंतर वापरण्यात येणाऱ्या तणनाशकाचा वापर करावा. बांधावर असणाऱ्या किडीच्या पुरक वनस्पतींचा नाश करावा. किड नियंत्रणाकरीता 12 ते 15 पक्षी थांबे प्रती हेक्टरी लावावे. किड नियंत्रणाकरीता 5 टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी.

         सुरुवातील मोठया प्रमाणात सोयाबीन पिवळे पडत असल्यास झिंक सल्फेट व फेरस सल्फेट 20 ग्रॅम 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. चक्रीभुंगा व खोळ अळीच्या नियंत्रणासाठी 5 ते 10 फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) प्रती हेक्टरी लावावे. तणनाशकाची फवारणी करतांना पाणी हे स्वच्छ व आम्लधर्मी (3 ते 6 पीएच) असावे. गढुळ पाणी वापरु नये. तण हे 2 ते 4 पाने या अवस्थेत असतांना फवारणी करावी. फवारणी करतांना पाणी 150 ते 200 लिटर प्रती एकर वापरावे. फवारणी करतेवेळेस जमीनीत ओलावा असणे आवश्यक आहे.

         ज्याठिकाणी पेरणी वेळेस खताचा बेसल डोस (मात्रा) दिला नसेल अशा ठिकाणी शिफारसीनुसार खताची मात्रा देण्यात यावी. किटकनाशकांची फवारणी करतांना पंपाची टाकी व नळी स्वच्छ गरम पाणी व धुण्याचा सोडा टाकून तीन ते चारवेळा स्वच्छ धुवावी. तसेच दोन टाकी पाणी बांधावर किंवा इतर ठिकाणी फवारणी करुनच किटकनाशकाची फवारणी करावी. ज्या शेतात मिलीपीड (वाणु व पैसा) चा प्रादुर्भाव दिसत असेल अशा ठिकाणी थायामेथॉक्सम 12.6 अधिक लँम्बडासीहॅलोथ्रीन 9.5 टक्के ZC किटकनाशक 4 मिली प्रती 10 लिटर पाण्यात टाकूण फवारणी करावी. ज्या शेतामध्ये शंख गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येतो अशा ठिकाणी आर्यन फॉस्फेट किंवा मेटाअल्डेहेडस 2.5 टक्के 2 किलो अधिक 200 लिटर पाणी घेऊन प्रती एकर फवारणी करावी किंवा 15 टक्के मिठाच्या द्रावणाची फवारणी किंवा लसून अर्क काढून फवारणी करावी. असे आवाहन शेतकरी बांधवांना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.     

                                                                                             *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे